कर्मचारी करोना बाधित आढळल्याने महापालिकेसह शहरात खळबळ
सार्वमत

कर्मचारी करोना बाधित आढळल्याने महापालिकेसह शहरात खळबळ

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

महापालिकेच्या नगररचना विभागातील एक कर्मचारी करोना बाधित आढळल्याने काल महापालिका कर्मचार्‍यांमध्ये घबराट पसरली. महापालिकेचे प्रवेशद्वार लगेच बंद करून अत्यावश्यक कामे असलेल्यांनाच महापालिका कार्यालयात प्रवेश देण्यात येत होता.

नगर शहरात गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे शहरातील संपूर्ण बाजारपेठेसह तोफखाना, नालेगाव, सिद्धार्थनगर, पद्मानगर, कवडेनगर हा परिसर सील केला आहे. महापालिका यावर उपाययोजना करण्यासाठी जंगजंग पछाडत आहे. असे असताना महापालिका कर्मचार्‍यालाच करोना झाल्याने खळबळ उडाली आहे.

महापालिकेतील नगररचना विभागातील हा कर्मचारी आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच करोनाची चाचणी करण्यात आली. त्यात ते पॉझिटीव्ह निघाले.

याची माहिती मिळताच महापालिकेत धावपळ उडाली. कार्यालयात येणार्‍या-जाणार्‍यांबाबत अधिक दक्षता घेण्याचे आदेश आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी दिली. त्यानंतर महापालिकेचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले. येणार्‍यांची चौकशी केली जात होती. अत्यंत आवश्यक काम असेल तरच त्यांना महापालिकेत सोडले जात होते.

प्रवेशद्वारावर यासाठी कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यता आली. महापालिकेत सुरुवातीला येणार्‍यांना सॅनिटायझर दिले जात होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून सॅनिटायझरचा वापर बंद झाला होता.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com