सार्वमत

अत्यावश्यक सेवा वगळता 14 दिवस कामकाज बंद ठेवा

कामगार युनियनची मनपा प्रशासनाकडे मागणी

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी| Ahmednagar

मनपा कर्मचार्‍यांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे, ही साखळी तोडण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता महापालिकेचे सर्व कार्यालये 14 दिवस बंद ठेऊन कर्मचार्‍यांना वर्क फ्रॉम होम करण्यास सांगून त्यांची दैनंदिन हजेरी नोदविण्यात यावी, अशी मागणी महापालिका कामगार युनियनने आयुक्त व महापौरांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे व सरचिटणीस आनंदराव वायकर यांनी आयुक्त श्रीकांत मायकलवार व महापौर बाबासाहेब वाकळे यांची भेट घेऊन निवेदन दिले. महापालिकेच्या कर्मचार्‍यांना करोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे त्यांची दैनंदिन हजेरी नोंदवून त्यांना घरून काम करण्याबाबत आदेश देण्यात यावे. कोविड केअर सेंटर आणि विलगकीरण कक्षात नियुक्त असलेल्या कर्मचार्‍यांना सलग तेथेच न ठेवता त्यांची शिफ्ट सात दिवसांची करण्यात यावी.

सात दिवसानंतर दुसरे कर्मचारी तेथे नियुक्त करण्यात यावेत. पन्नास वर्षांपुढील कर्मचार्यांना 14 दिवसांची पगारी सुट्टी देण्यात यावी. करोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या पालिकेच्या दोन कर्मचार्यांना संरक्षण कवच अंतर्गत 50 लाखांची नुकसान भरपाई मिळावी म्हणून सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात यावा. महापालिका कामगारांसाठी पन्नास बेडचे स्वतंत्र कोविड केअर सेंटर सुरू करण्यात यावे, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com