अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महापालिकेच्या चारही पाणीपुरवठा यंत्रणेवरील वीज बिलाची थकबाकी वाढली आहे. ही थकबाकी वसुलीसाठी वीजजोडणी तोडणीचे संकेत

महावितरण कंपनीच्या अहमदनगर कार्यालयाने महापालिकेला दिले आहेत. अधीक्षक अभियंता यांनी यासंदर्भात आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना पत्र लिहिले आहे. महापालिकेकडे 202 कोटी 80 लाख 22 हजार 223 रुपये एवढी रक्कम वीज बिलापोटी थकली असल्याचे पत्रात नमूद केले आहे.

महापालिकेचे विळद, वडगाव गुप्ता, मुळानगर आणि वसंत टेकडी येथे पाणीपुरवठा केंद्र आहेत. या केंद्रांसाठी उच्चदाब वीज वापरली जाते. या चारही केंद्रांवरील वीज बिल थकले आहे. लॉकडाऊनच्या काळापासून वीज बिल भरणा देखील झालेला नाही. त्यामुळे थकीत वीज बिल, त्यावरील व्याज, विलंब शुल्क वाढत गेले आहे. त्यातून थकीत वीज बिलाचा आकडा हा 202 कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आहे.

महापालिकेने लॉकडाऊनच्या काळात 13 कोटी 94 लाख 43 हजार 623 रुपये एकदाच वीज बिल भरले आहे. थकीत वीज बिलापोटी ही रक्कम खूपच तोकडी असल्याचे अधीक्षक अभियंता यांनी पत्रात म्हटले आहे. दरम्यान, महापालिकडे शास्ती माफीतून 41 कोटी रुपये महसूल जमा आहे. यातून वीज बिलातील काही रक्कम भरण्याची तयारी महापालिका प्रशासनाने केल्याची माहिती पुढे येत आहे.