मनपा सावेडीमध्ये उभारणार हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारा प्रकल्प - आ. जगताप

तिसर्‍या लाटेमध्ये ऑक्सिजन कमी पडून देणार नाही
मनपा सावेडीमध्ये उभारणार हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारा प्रकल्प - आ. जगताप
आ. संग्राम जगताप

अहमदनगर (प्रतिनिधी) - करोनाबाबत उपाय करत असताना अडचणींना सामोरे जावे लागत होते. यामध्ये प्रामुख्याने ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासत होता. याच पार्श्‍वभूमीवर मनपा सावेडी अमरधामजवळ हवेतून ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

त्यामुळे येणार्‍या तिसर्‍या लाटेमध्ये उपाययोजना करण्यात मदत होईल, यापुढील काळामध्ये शहरांमध्ये ऑक्सिजन कमी पडू दिला जाणार नाही, मनपाच्या माध्यमातून ना नफा- ना तोटा या तत्वावर ऑक्सिजन प्रकल्प काम करणार असल्याचे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.

सावेडी अमरधाम जवळील मोकळ्या जागेत मनपाच्या वतीने साकरण्यात येणार्‍या हवेतील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाची जागेची पाहणी आ. जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, स्थायी समिती सभापती अविनाश घुले, विरोधी पक्षनेता संपत बारस्कर, आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ. सागर बोरुडे, ज्येष्ठ नगरसेवक गणेश भोसले, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बारस्कर, नगरसेवक राजेश कातोरे, उपायुक्त यशवंत डांगे, नगर रचनाकार चाटणकर, शहर अभियंता सुरेश इथापे, युवराज चव्हाण आदी उपस्थित होते.

यावेळी महापौर वाकळे यांनी सांगितले, सावेडीतील अमरधाम जवळील जागेत हवेतील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरु करण्यात येणार असून 125 जम्बो सिलेंडर प्रतिदिन निर्मिती करण्यात येणार आहे. सुमारे 650 लिटर ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे. या प्रकल्पाची 27 मे रोजी ही निविदा उघडण्यात येणार असून, लवकरच कामालाही सुरुवात होणार असल्याचे महापौर वाकळे यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com