मंगळवारी स्थायीची ऑनलाईन सभा

झूम अ‍ॅपवर होणार चर्चा, सभेत 23 विषय मंजुरीला
मंगळवारी स्थायीची ऑनलाईन सभा

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

करोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन असल्याने चार महिन्यांपासून महापालिकेची एकही सभा होऊ शकली नाही. त्यामुळे एकाही नवीन कामास मंजुरी मिळालेली नाही. अनेक नगरसेवकांनी ऑनलाईन सभा घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता येत्या मंगळवारी (दि. 21) महापालिकेच्या स्थायी समितीची सभा ऑनलाइन झूम अ‍ॅपच्या माध्यमातून दुपारी 1 वाजता होणार आहे. तसा आदेश नगरसचिवांनी काढला आहे. या सभेपुढे 23 विषय ठेवण्यात आले आहेत.

मागील चार महिन्यांपासून महापालिकेतील एकही सभा झाली नाही. त्यामुळे शहरातील अनेक विकासकामे मंजुरीअभावी ठप्प आहेत. त्यामुळे अनेक नगरसेवकांनी ऑनलाईन सभा घेण्याची मागणी केली होती. राज्य सरकारने 3 जुलैला आदेश काढून सर्व महापालिकांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सभा घेण्यात यावी असे पत्र दिले होते. त्यानुसार नगर महापालिकेची स्थायी समितीची सभा येत्या मंगळवारी दुपारी 1 वाजता आयोजित केली आहे.

महापालिकेचे स्पर्धा परीक्षा केंद्र सामाजिक अथवा शैक्षणिक संस्थेमार्फत चालविण्यास देण्यासह ‘अमृत’अंतर्गत हरित क्षेत्र विकास प्रकल्प आणि विविध विकासकामांच्या निविदा मंजुरीसाठी सभेच्या अजेंड्यावर आहेत. महापालिकेच्या विविध विभागांतील मानधनावरील कर्मचार्‍यांना तांत्रिक खंड देऊन पुनर्नियुक्ती, मालमत्ता कर निर्लेखित करणे, महापालिका कर्मचार्‍यांना सानुग्रह अनुदान देण्यासाठी वाढीव तरतूद करणे, तसेच मागील सभांचे इतिवृत्त कायम करण्यासह एकूण 23 विषय सभेत ठेवण्यात आलेले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com