सभापती निवडीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांच्या कोर्टात

मनपा स्थायी समिती : करोना संसर्ग निवड सभेला मंजूरी मिळणार विद्यमान गाडा हाकणार
सभापती निवडीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांच्या कोर्टात

अहमदनगर|प्रतिनिधी| Ahmednagar

करोनाने मनपा प्रशासन अडचणीत असतानाच स्थायी समिती सभापतिपदासाठी तातडीने निवडणूक घ्यावी, यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान, बुधवारी सायंकाळी उशीरा स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आल्याची माहिती मनपा प्रशासनाने दिली. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर विभागी आयुक्त स्थायी समितीच्या सभापती निवडीच्या कार्यक्रमाला मान्यता देणार की सभापती पद रिक्त राहणाणर याकडे नगरकरांचे लक्ष आहे.

महापालिका स्थायी समितीमध्ये नुकतीच रिक्त असलेल्या 8 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. 16 सदस्य असलेल्या स्थायी समितीतील 8 सदस्य दरवर्षी निवृत्त होतात. जानेवारीत रिक्त झालेल्या जागांवर सदस्य नियुक्त करण्यासाठी सभा घ्यावी, असे सत्ताधार्‍यांना वाटले नाही. मार्चनंतर करोनाने कहर वाढल्याने सभा घेण्यास बंदी आली.

मात्र, नुकत्याच झालेल्या मनपा ऑनलाईन सभेत या जागांवर नियुक्त्या करण्यात आल्या. त्यामध्ये परवीन कुरेशी, प्रकाश भागानगरे, डॉ. सागर बोरूडे, (राष्ट्रवादी), शाम नळकांडे, विजय पठारे (शिवसेना), सोनाबाई शिंदे, मनोज कोतकर (भाजप), सुप्रिया जाधव (काँग्रेस) यांची नियुक्ती करण्यात आली.

महापालिकेत सत्तेसाठी राष्ट्रवादी, भाजप, बसप थेट एकत्र आले, तर काँग्रेसची त्यांना अप्रत्यक्ष साथ आहे. महापौर, उपमहापौरांसह सर्व प्रमुख पदे भाजपकडे आहेत. राष्ट्रवादीने त्यांना विनाशर्त पाठिंबा दिला आहे. बसपचे 4 नगरसेवक असून, पुढील चार वर्षे स्थायी समिती बसपकडे राहील, असा शब्दही देण्यात आला होता. त्यानुसार पहिल्या वर्षी मुदस्सर शेख यांना संधी मिळाली. दुसर्‍या वर्षीचे सहा महिने संपले आहेत. तसेच समितीमध्ये बसपचे शेख हेच एकमेव सदस्य असल्याने त्यांना पुन्हा संधी मिळणे अशक्य आहे. जो कोणी सभापती होईल, त्याला आता सहा महिनेच कारभार करता येईल.

त्यातही कोरोना असल्याने सभांवर बंधने असल्याने सभापतिपद मिळविण्यामागे असलेला हेतू सहा महिन्यांत साध्य होईलच असेही नाही. त्यामुळे यावेळी सभापतिपदासाठी फारसे कोणी इच्छूक नसतील, असे मानले जात होते. मात्र रिक्त जागांवर नियुक्त्या होताच अनेकांनी फिल्डिंग लावण्यास सुरूवात केली आहे. तर राष्ट्रवादीनेही सभापतिपद मिळविण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून भाजप देखील हे पद मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे.

सर्वाधिक नगरसेवक असूनही सत्तेपासून दूर राहिलेली शिवसेना अडचणीत आहे. ही परिस्थिती भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यासाठी फायदेशीर आहे. राष्ट्रवादीकडून अनुभवी म्हणून गणेश भोसले यांचे नाव सभापतिपदासाठी घेतले जात आहे. कुमार वाकळे देखील इच्छूक होते, मात्र सहा महिन्यांचाच कालावधी मिळणार असल्याने ते सुध्दा तळ्यामळ्यात असल्याची चर्चा आहे.

तांत्रिकदृष्ट्या भाजपचे असलेले मनोज कोतकर यांनी मात्र गुडघ्याला बाशिंग लावल्याचे बोलले जाते. भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले असले तरी राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांचे समर्थक आहेत. मात्र, हे सर्व विभागीय आयुक्तांनी करोना पार्श्‍वभूमीवर सभापती निवडीस परवानगी दिल्यानंतर शक्य होणार आहे. यामुळे सध्या स्थायी समितीच्या सभापती निवडीचा विषय विभागीय आयुक्तांच्या कोर्टात असून ते काय निर्णय घेतात, याकडे शहराचे लक्ष आहे.

असे आहे स्थायीचे बलाबल

मनपा स्थायी समितीमध्ये 16 सदस्य असून यात शिवसेना 5, राष्ट्रवादी 5, भाजप 4 आणि कॉग्रेस आणि बसपा प्रत्येकी एक सदस्य आहे. मनपातील सत्तेचा फॉम्युला या ठिकाणी कायम राहिल्यास शिवसेना एकाकी राहणार आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com