अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महापालिकेच्या अधिपत्याखाली असलेले कै. बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटलची इमारत नव्याने बांधण्यासोबतच सावेडीत नव्याने

हॉस्पिटल उभारणीचा विचार महापालिकास्तरावर सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून समजली. त्यासाठी महापालिका प्रशासनाने 5 कोटी रूपयांचा प्रस्ताव तयार करून केंद्र शासनाकडे निधी मागितला आहे. खासदार डॉ. सुजय विखे यांचा त्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

मोफत रुग्णसेवा करणारे महापालिकेचे कै. बाळासाहेब देशपांडे हे एकमेव हॉस्पिटल आहेत. आर्थिक स्थिती बिकट असलेले अनेक पेशंट याच हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात. मात्र तेथील इमारत मोडकळीस आली असून जीव मुठीत धरून तेथे रुग्णावर उपचार सुरू आहेत.

गरीबांच्या सेवेसाठी उभारण्यात आलेले शहराच्या मध्यवर्ती असलेले कै.देशपांडे हॉस्पिटलमध्ये शहरी व ग्रामीण भागातील महिलांची प्रसूती या ठिकाणी होत असतात. सर्वसामान्य नगरकरांना या रूग्णालयाचा मोठा आधार आहे.

कै.देशपांडे रुग्णालयाची अवस्था अतिशय दयनीय झालेली असून ते दुरुस्त करावे, अथवा त्याच ठिकाणी नवीन रुग्णालये बांधावे असा विषय तत्कालीन नगरसेवक संजय चोपडा यांच्यासह विविध नगरसेवकांनी महापालिकेच्या महासभेपुढे मांडला होता. नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी सुद्धा तो विषय महासभेच्या अजेंड्यावर घेत तसा ठराव करावा अशी मागणी त्यावेळी केली होती.

देशपांडे रूग्णालयाचा विषय मार्गी लावण्यासाठी तत्कालीन महापौर सुरेखा कदम यांनीदेखील राज्यसरकारकडे विशेष निधीची मागणी केलेली आहे. त्या सभेमध्ये नव्याने देशपांडे रुग्णालयात बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

खा. डॉ. सुजय विखे, महापौर बाबासाहेब वाकळे यांनी यासदंर्भात प्रशासनाला प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्रस्ताव तयार करत नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत पाच कोटी रूपयांची मागणी केंद्र शासनाकडे केली आहे.

या निधीतून देशपांडे रूग्णालयाची इमारत नव्याने बांधण्यासोबतच सावेडीसाठी स्वतंत्र नवे हॉस्पिटल उभारणीच्या हालचाली सुरू आहेत. महापालिकेने आरक्षित केलेल्या जागेचा विचार त्यासाठी सुरू असल्याचे समजते.

सावेडीत स्थलांतर

केंद्र शासनाकडून निधी आल्यानंतर देशपांडे रुग्णालयाची नव्याने इमारत बांधण्यासाठी सावेडीत तात्पुरते स्थलांतर केले जाणार आहे. तशा हालचाली सुरू असल्याचे समजते. सावेडीतील अग्नीशमनशेजारी असलेल्या मार्केटच्या इमारतीत देशपांडे हॉस्पिटलचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते. तसा विषय खा. विखे, महापौर वाकळे आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त बैठकीत चर्चेला आल्याचे सूत्रांकडून समजले.

शहराची वाढती लोकसंख्या पाहता सावेडीसाठी स्वतंत्र हॉस्पिटल बांधण्याचा विचार आहे. केंद्र शासनाकडून निधी आल्यानंतर कोणत्या ठिकाणी बांधायचे याचा निर्णय घेतला जाईल. देशपांडे हॉस्पिटलची इमारतही नव्याने बांधण्यासाठी निधीची मागणी केली आहे.
- बाबासाहेब वाकळे, महापौर

वाढता विस्तार पाहता शहराला आणखी एका हॉस्पिटलची गरज आहे. पाठीमागील बाजूची जुनी इमारत पाडून तेथे नव्याने इमारत बांधली जाईल. नंतर पुढची इमारत पाडून तेथे बांधकाम होईल. सावेडीसाठी स्वतंत्र हॉस्पिटल निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.
- डॉ. अनिल बोरगे, आरोग्य विभागप्रमुख