अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहर व परिसरातील मोकाट कुत्रे व जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी वेळोवेळी करण्यात आली.

तसे चार वेळेस पत्र देऊन देखील प्रशासनाने याबाबत कोणतीही कारवाई केली नाही, येत्या आठ दिवसांमध्ये मोकाट कुत्रे व जनावरांचा बंदोबस्त न केल्यास आयुक्तांच्या दालनासमोर मोकाट जनावरे सोडविण्यात येतील, असा इशारा मनपा विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. याप्रकरणी बारस्कर यांनी मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना निवेदन दिले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहर व परिसरात सकाळी नागरिक फिरण्यासाठी बाहेर पडतात. तसेच औद्योगिक वसाहतीत रात्री कामगार जात असतात. त्यांच्यावर कुत्रे हल्ले करत असून यापूर्वी असे प्रकार घडलेले आहेत. यामुळे शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. दिवसभर शहरातील प्रमुख रस्ते, उपनगरातील रस्त्यांवर वर्दळ असते.

रस्त्यावर वाहने चालवताना मोकाट जनावरांचा मोठा अडथळा निर्माण होतो. यामुळे अपघात देखील घडतात. ही बाब वेळोवेळी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. कोंडवाडा विभागाकडून मोकाट कुत्रे व जनावरे पकडण्याचे काम यापूर्वी केले जात होते. परंतु, अलिकडे जनावरे व कुत्र्यांचा बंदोबस्त केला जात नाही. यामुळे आठ दिवसामध्ये मोकाट कुत्रे व जनावरांचा बंदोबस्त न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा बारस्कर यांनी दिला आहे.