महापालिकेने वसूल केला अडीच लाखांवर दंड
सार्वमत

महापालिकेने वसूल केला अडीच लाखांवर दंड

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अहमदनगर शहरात गेल्या 4 जुलैपासून सायंकाळी सातपासून प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी 20 पथकांची नियुक्ती केली आहे. नियमांचे उल्लंघन करणार्‍या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.

पोलीस अधिकारी, कर्मचारी, महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी यांच्या संयुक्त पथकाने 4 जुलै ते 22 जुलै दरम्यान दोन लाख 56 हजार 670 रुपयांचा दंड वसूल केला. पथकाने ही कारवाई तोफखाना व कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत केली आहे.

शहरामध्ये करोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, मास्क व सॅनिटायझर्सचा वापर न करणे, विनाकारण फिरणे, वेळेनंतरही दुकाने सुरू ठेवणे असे उद्योग नागरिकांकडून सुरू आहेत. यामुळे मागील पंधरा दिवसांपासून शहरामध्ये करोना रुग्णात वाढ झाली आहे.

तरीही नागरिकांकडून नियमांचे पालन केले जात नाही. यामुळे संसर्ग झपाट्याने वाढत आहे. लोक विनाकारण घराबाहेर पडत असल्याने व नियमांचे पालन करत नसल्याने सुरुवातीला 4 ते 17 जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केला होता. करोना वाढत असल्याने प्रतिबंधात्मक आदेशात प्रशासनाकडून वाढ करण्यात आली. 31 जुलैपर्यंत हा आदेश लागू असणार आहे.

तोफखाना व कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत या पथकांना फिक्स पॉइंट देण्यात आले आहेत. या पथकाचे समन्वय अधिकारी म्हणून महापालिकेचे उपायुक्त प्रदीप पठारे काम पाहत आहे. तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत नेमणुकीस असलेल्या पथक क्रमांक 1 ते 12 यांनी एक लाख 80 हजार 400 रुपये दंड वसूल केला.

उपायुक्त प्रदीप पठारे, किरण फाकटकर, दिनेश पुरी यांनी व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. तसेच, प्रभारी उपायुक्त संतोष लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत कार्यरत असलेल्या पथक क्रमांक 13 ते 20 यांनी 76 हजार 270 रुपये दंड वसूल केला आहे. या 20 पथकांनी 19 दिवसांमध्ये दोन लाख 56 हजार 670 रूपये दंड वसूल केला आहे.

पथकाकडून अजूनही ही कारवाई सुरू आहे. तरीही लोकांकडून नियमांचे उल्लंघन होते आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे व करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेत महापालिकेस सहकार्य करावे, असे अवाहन करण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com