करोनाच्या चर्चेच्यावेळी आरोग्य अधिकार्‍यांचीच दांडी
सार्वमत

करोनाच्या चर्चेच्यावेळी आरोग्य अधिकार्‍यांचीच दांडी

मनपा स्थायी समितीची ऑनलाईन सभा : सदस्य संतप्त

Arvind Arkhade

अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar

महापालिकेच्या स्थायी समितीची ऑनलाईन सभा सभापती मुदस्सर शेख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. स्थायी समितीच्या 16 सदस्यांनी या सभेत सहभाग घेतला. सभेपुढे आलेले सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले. यासह शहरातील करोना कहरवर चर्चा सुरू असताना आरोग्य विभागाचे अधिकारी गैरहजर होते.यामुळे सदस्यांनी संताप व्यक्त केला.

या ऑनलाईन सभेत 14 व्या वित्त आयोगातून व्हेंटिलेटरसह आवश्यक साहित्य खरेदी करून केअर सेंटर उभे करण्याचा ठराव स्थायी समितीने केला. सभेच्या सुरुवातीला शिवसेना उपनेते, माजी आमदार स्व. अनिल राठोड यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. शहरामध्ये करोना रुग्ण संख्या वाढत आहे.

वाढते करोना रुग्ण व उपाययोजना यावर महापालिकेच्या स्थायी समिती सभेत चर्चा झाली. सदस्यांनी उपस्थित केलेल्या करोनासारख्या गंभीर विषयांवर चर्चा करताना महापालिकेचा एकही संबंधित विभागाचा अधिकारी नसल्याने सदस्यांनी संताप व्यक्त केला. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे आजारी असल्याने ते रुग्णालयात दाखल झालेले आहेत, असे असतानाही आरोग्य विभागाची जबाबदारी अद्याप कोणाकडेही सोपविलेली नसल्याने गणेश भोसले, प्रकाश भागानगरे यांच्यासह इतर सदस्यांनी प्रशासनाला जाब विचारला.

उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांच्याकडे आरोग्य विभाग नसल्याने ते सदस्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकले नाहीत. सदस्यांच्या भावना आयुक्तांपर्यंत पोहचविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. महापालिकेने सुरू केलेल्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये दाखल होण्यासाठी देखील वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांची परवानगी घ्यावी, असे सांगितले जाते. हे कशासाठी, असा प्रश्न मनोज कोतकर यांनी उपस्थित केला. इतर विषयांवर फार चर्चा न करता ते मंजूर करण्यात आले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com