महानगरपालिका अधिकार्‍यांविरोधात फिर्याद देणार्‍या मुलाला चौघांकडून मारहाण

महानगरपालिका
महानगरपालिका

अहमदनगर (प्रतिनिधी) - महापालिका अधिकार्‍यांच्या विरोधात फिर्याद देणार्‍या अल्पवयीन मुलास बुधवारी चौघा अज्ञातांनी मारहाण केल्याची घटना घडली. तशी फिर्याद त्याने कोतवाली पोलिसांत दिली आहे.

महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, अग्निशमन विभागाचे प्रमुख शंकर मिसाळ, कर्मचारी बाळू घाटविसावे यांच्या विरोधात त्याने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, या अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल झाला आहे. घरात येऊन दारूची पार्टी करणे, त्यास विरोध केला म्हणून चटके देणे, मारहाण करणे, इमारतीवरून फेकून देण्याचा प्रयत्न करणे आदी तक्रारी या मुलाने केल्या आहेत.

या मुलास बुधवारी दुपारी चौघांनी मारहाण केली. हा प्रकार तो सध्या आजीकडे राहत असलेल्या शनी गल्लीत झाला. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी चौघांविरुद्व अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली असल्याची माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी दिली.

पालिकेच्या रुग्णालयात नर्स म्हणून काम करत असलेल्या आपल्या आईचे मिसाळ यांचे संबंध असल्याचा आरोप या मुलाने केलेला आहे. या अधिकार्‍यांसह आपल्या आईविरोधातही त्याने फिर्याद दिलेली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी पसार झाले आहेत. तोफखाना पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. बुधवारी या मुलाला मारहाण झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच निरीक्षक लोखंडे कर्मचार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले. या मुलास किरकोळ जखमा झाल्या असून ज्यांनी मारहाण केली त्यांना तो ओळखत नसल्याचे निरीक्षक लोखंडे यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com