महानगरपालिकेने उभारले 100 बेडचे कोविड सेंटर
सार्वमत

महानगरपालिकेने उभारले 100 बेडचे कोविड सेंटर

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

करोनाचा प्रसार शहरामध्ये झपाट्याने होत असताना बूथ हॉस्पिटल व जिल्हा रुग्णालय तसेच इतर काही खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी जागा शिल्लक नाही. त्यामुळे नगर महापालिकेमार्फत दसरेनगर येथील आनंद लॉन येथे नव्याने सुरू झालेल्या 100 खाटांच्या कोविड रुग्णांना मोफत उपचार सेवा पुरविण्यात येणार आहे. तसेच येथे मनपाच्या खर्चाने रुग्णांसाठी मोफत भोजन व्यवस्था करण्यात आली आहे.

या ठिकाणी मनपाचे एक एमडी फिजिशियन, एक बालरोग तज्ज्ञ, एक जनरल डॉक्टर, नर्सेस, आरोग्य व इतर विभागातील 15 कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. याची पाहणी बुधवारी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केली. यावेळी आयुक्त श्रीकांत मायकलवाल, भाजप शहर जिल्हाध्यक्ष नगरसेवक महेंद्र गंधे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी केली.

महापौर वाकळे म्हणाले, लॉकडाऊन काळात मनपाने करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती मोहीम हाती घेतली. ती आजतागायत सुरू आहे. मनपाच्या व्हिजिलन्स स्कॉडद्वारे नियम न पाळणार्‍यांवर कारवाई केली. तसेच रामकरण सारडा येथे शहरातील नागरिकांसाठी मोफत स्त्राव चाचणी केंद्र सुरू करण्यात आले.

या काळात मनपाने सात आरोग्य केंद्रांमार्फत 42 आरोग्य पथकांची नियुक्ती केली. या पथकांमार्फत पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेल्या भागात सर्वेक्षण करणे, हाय व लो रिस्क कॉण्टॅक्ट शोधणे, त्यांच्या चाचण्या करणे, संबंधित ठिकाणी निर्जंतूकीकरण करून घेणे आदी कामे केली जातात. आजपर्यत शहरामध्ये 55 ते 56 कंटेन्मेंट झोन मनपाद्वारे जाहीर करण्यात आले. काही अद्याप सुरू आहेत.

कंटेन्मेट झोनमध्ये मनपामार्फत नागरिकांसाठी दूध, भाजीपाला, औषधे तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व इतर काही तातडीच्या सेवा देण्यात येत आहेत. मनपाचे आतापर्यत 13 क्वारंटाईन सेंटर कार्यरत असून दोन हजार बेडची क्षमता या सेंटरची आहे. या सेंटरमध्येही मनपामार्फत सर्व सुविधा पुरविल्या जातात.

यावेळी भाजप शहर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक महेंद्र गंधे म्हणाले, मनपाने सुरू केलेल्या कम्युनिटी किचनमार्फत आजपर्यंत 20 ते 25 हजार नागरिकांना मोफत अन्नवाटप करण्यात आले. हॉटेल संजोग व जाधव लॉन या दोन ठिकाणी अत्यंत सुसज्ज किचनसह या कम्युनिटी किचनची सुरुवात करण्यात आली होती. यातील संजोग लॉन येथील किचन नागरिकांच्या सेवेत अजूनही उपलब्ध आहे.

करोनाची बाधा झालेल्यांवर बूथ हॉस्पिटल येथील रूग्णांचा सर्व खर्च मनपामार्फत केला जातो. तसेच एम्स हॉस्पिटलमधील रुग्णांवर मनपा आणि काही खासगी संस्थांमार्फत खर्च करण्यात येत असल्याचे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com