कोविड सेंटरमध्ये चहाची दुकानदारी
सार्वमत

कोविड सेंटरमध्ये चहाची दुकानदारी

डॉक्टर पेशंटकडे फिरकेना । नर्सच्या हाती कारभार

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

मोठा गाजावाजा करत महापालिकेने दसरेनगरात शंभर बेडचे कोविड सेंटर सुरू केले खरे पण तेथील पेशंटकडे डॉक्टर ढुंकूनही पाहत नाहीत. नर्सच्या हाती सगळा कारभार आहे. मोफत असलेला चहा विकत घेऊन घसा गरम करावा लागत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बारा तास उलटल्यानंतर अजूनही बाधितांना औषधे दिली गेली नाहीत. तेथील अ‍ॅडमीट पेशंटनेच ही माहिती फोनवरून ‘नगर टाइम्स’ला दिली.

नगर शहरात कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता महापालिकेने दसरेनगरात आनंद लॉन्स येथे शंभर खाटांचे कोविड सेंटर सुरू केले आहे. आमदार जगताप पिता-पूत्रांनी पुृढाकार घेत आयुर्वेद कॉलेजमध्ये गुरूआनंद कोवीड सेंटर सुरू केले आहे. सिव्हील, बूथ हॉस्पिटल फुल्लं झाल्यानंतर पॉझिटिव्ह पेशंट आता आयुर्वेद व दसरेनगरच्या कोवीड सेंटरमध्ये पाठविले जात आहेत. तोफखान्यातील एकाच घरातील पाच जण पॉझिटिव्ह असून त्यातील एक आयुर्वेदला तर तिघे दसरेनगरात व एक सिव्हीलमध्ये अ‍ॅडमीट आहे. या पेशंटनी ‘नगर टाइम्स’शी संपर्क साधत तेथील सुविधेची माहिती दिली.

आयुर्वेदमधील गुरू आनंद सेंटरमधील सुविधेवर पेशंट अत्यंत समाधानी असल्याचे सांगितले. टूथ ब्रशपासून संरक्षक किट, नाष्टा, जेवण-चहा, दोन वेळेस डॉक्टरांची तपासणी, गरम पाणी, काढा दिला जातो. अ‍ॅडमीट होताना मात्र प्रतिदिन दीड हजार रुपयांप्रमाणे सात दिवसांचे साडेदहा हजार रूपये भरले, पण सुविधा अत्यंत चांगल्या मिळत असल्याची भावना तोफखान्यातील पेशंटनी व्यक्त केली. त्यांच्याच फॅमिलीतील तिघे दसरेनगरच्या आनंद लॉन्समधील कोवीड सेंटरमध्ये अ‍ॅडमीट आहे. तेथील पेशंटने मात्र महापालिकेच्या अनागोदी कारभाराचा पाढा वाचला.

बुधवारी रात्री तेथे अ‍ॅडमीट झालो. सकाळी गरम पाणी नाही. बाथरूमलाही पाणी नव्हते. सकाळी दहा वाजेनंतर वापराचे पाणी आले. डॉक्टरांनी तर अजून ढुंकणही पाहिले नाही. फक्त नर्स विचारपूस करतात. थर्मामिटरने चेकिंग केले जाते. औषधं अजून दिलेली नाही. सकाळचा नाष्टा म्हणून पोहे तेवढे दिले. सकाळी चहा आला पण तो विकत घ्या असे सांगण्यात आले. वास्तविक महापालिकेने व्यवस्था करणे गरजेचे असतानाही ती झाली नाही. कोरोना बरा होण्यासाठी अ‍ॅडमीट केले की शिक्षा म्हणून हेच कळत नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. माझ्यासह येथे 22 पेशंट अ‍ॅडमीट आहेत. सगळ्यांची हिच अवस्था असल्याची माहिती या पॉझिटिव्ह पेशंटने दिली.

डॉ. नलिनी थोरात यांची आनंद लॉन्सच्या कोवीड सेंटरमध्ये नियुक्ती केली असल्याची माहिती महापालिका आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. अनिल बोरगे यांनी दिली. आनंद लॉन्समध्ये डॉक्टर अजून पेशंटपर्यंत पोहचलेच नाही याबाबत विचारले असता त्यांनी माहिती घेऊन सांगतो, असे त्रोटक उत्तर दिले.

महापालिकेने या ठिकाणी एक एमडी फिजिशीएन, एक बालरोग तज्ज्ञ, एक जनरल डॉक्टर, नर्स व आरोग्य विभागातील इतर कर्मचारी असा 15 जणांचा स्टाफ दिला आहे. मात्र तेथे आज दुपारी उशिरापर्यंत डॉक्टर पोहचलेच नसल्याची माहिती हाती आली. महापालिकेची नियुक्ती फक्त कागदोपत्रीच का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. डॉ. नलिनी थोरात यांनी मात्र असे काही नसल्याचा दावा केला.

Deshdoot
www.deshdoot.com