अहमदनगर (प्रतिनिधी) -

महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी रिटायरमेंटच्या दिवशी सह्या करून पारीत केलेले बदल्यांचे आदेश स्थगित करण्याचे आदेश

प्रभारी आयुक्त तथा कलेक्टर राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत. त्याचबरोबर 31 डिसेंबरच्या दिवशी सह्या केलेल्या प्रस्ताव, आदेशाची तपासणी करण्याचे आदेशही त्यांनी काढले आहेत.

श्रीकांत मायकलवार हे 31 डिसेंबरला महापालिकेच्या सेवेतून रिटायर झाले. रिटायरमेंटच्या दिवशीच त्यांनी अनेक फाईल्सवर सह्या केल्या. टीपीतील अनेक प्रकरणांना मंजुरी दिली. घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अनेक फाईल्सवर सह्या करून आदेश पारीत केले. आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना पाच लाख रुपये खर्चापर्यंतचे अधिकार दिले. त्यासाठी महासभेची मान्यता घेतली नाही. त्यामागे आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप करणारी तक्रार नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी कलेक्टर भोसले यांच्याकडे केली होती.

मायकलवार यांच्या रिटायरमेंटनंतर महापालिका आयुक्त पदाचा प्रभारी पदभार कलेक्टर भोसले यांच्याकडे देण्यात आला आहे. बोराटे यांच्या तक्रारीची दखल घेत कलेक्टर भोसले यांनी आयुक्तांनी 31 डिसेंबरला केलेल्या बदल्या आणि नेमणुकांचे आदेश स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय आयुक्तांनी कोणकोणत्या फाईल्स, प्रस्तावावर सह्या केल्या त्याची शहनिशा करावी असेही आदेशित केले आहे.

लहारे, तडवी जैसे थे

तत्कालीन आयुक्त मायकलवार यांनी नगरसचिव पदी मेहेर लहारे यांची नियुक्ती केली होती. नगरसचिव असलेले शहाजान तडवी यांना पुन्हा मुळ सामान्य प्रशासन विभागात पाठविले होते. तसेच अस्थापना विभागाचा चार्ज उपायुक्त सचिन राऊत यांच्याकडे देण्यात आला होता. तसे आदेश मायकलवार यांनी पारित केले होते. आता कलेक्टर तथा प्रभारी आयुक्त राजेंद्र भोसले यांच्या आदेशामुळे या बदल्यांना स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे लहारे, तडवी यांच्या नियुक्त्या सध्यातरी जैसे थे राहिल्या असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

विभागप्रमुखांना विचारणा

कलेक्टरांच्या आदेशानंतर उपायुक्त प्रदीप पटारे यांनी विभागप्रमुखांना पत्र पाठवून आयुक्तांनी कोणत्या फाईल्स, आदेश काढले याची माहिती विचारली आहे. तसेच आयुक्तांनी काढलेले आदेश योग्य की कसे, या अभिप्रायासह माहिती कळवावी असे लेखी पत्र विभागप्रमुखांना काढले आहे. विभागप्रमुखांचा अभिप्रायासह माहिती आल्यानंतर तो अहवाल कलेक्टर भोसले यांना देण्यात येणार असल्याचे उपायुक्त पटारे यांनी सांगितले.

रिटायरमेंटच्या दिवशी प्रलोबनाला बळी पडत श्रीकांत मायकलवार यांनी नको ते आदेश काढले. ते चुकीचे असून त्याचा शेवटपर्यंत पाठपुरावा करून ते रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

- बाळासाहेब बोराटे, नगरसेवक.