आंबीतील ट्रान्सफॉर्मर देतोय अपघाताला निमंत्रण

आंबीतील ट्रान्सफॉर्मर देतोय अपघाताला निमंत्रण

आंबी |वार्ताहर| Ambi

राहुरी तालुक्यातील आंबी येथील आंबी-कोल्हार रोडवरील आदिवासी समाजाच्या लोकवस्तीत असलेल्या ट्रान्सफॉर्मरच्या फ्युजा गायब असून वीज प्रवाह करणार्‍या तारा उघड्या पडलेल्या आहेत. त्यामुळे हा ट्रान्सफॉर्मर दुर्घटनेला आमंत्रण देत आहेत.

सदरच्या ट्रान्सफॉर्मरमार्फत गावात व परिसरात विद्युतपुरवठा केला जातो. मात्र या ट्रान्सफॉर्मरकडे महावितरणच्या कर्मचार्‍यांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. हा ट्रान्सफॉर्मर रस्त्याच्या कडेला असून जवळच आदिवासी समाजाची दाट लोकवस्ती आहे. ट्रान्सफॉर्मरचे फ्यूज गायब असून वीज प्रवाह करणार्‍या तारा उघड्या पडल्या आहेत. जमिनीपासून हाताने स्पर्श होऊ शकतील, अशा अवघ्या दोन ते तीन फुटांवर या उघड्या फ्यूज संचाभोवती कुठलाही संरक्षक बॉक्स नाही. सावधानतेचा कोणताही इशारा दिलेला नाही.

हा ट्रान्सफॉर्मर गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने त्या ठिकाणी नेहमीच मोठी वर्दळ असते. तसेच हाकेच्या अंतरावर जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा, अंगणवाडी असल्याने लहान मुलांचा मोठा वावर असतो. अशी परिस्थिती असताना या उघड्या पडलेल्या ट्रान्सफॉर्मरकडे महावितरणच्या अधिकारी व कर्मचार्‍यांचे दुर्लक्ष होत आहे. उघड्या तारांना जनावरांचा, लहान मुलांचा अथवा एखाद्या मद्यापीचा स्पर्श झाल्यास जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदर उघड्या फ्यूज संचाची उंची वाढवून त्याभोवती संरक्षक बॉक्स बसवावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून हा ट्रान्सफॉर्मर उघड्यावर आहे. तो रस्त्याच्या कडेला असताना त्यावर कोणताही धोक्याचा इशारा नाही. भविष्यात मोठी जीवित अथवा वित्तहानी झाल्यास त्यास जबाबदार कोण? संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर उपाययोजना करावी, अन्यथा धनगर समाज संघर्ष समितीच्यावतीने महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन केले जाईल.

- जालिंदर रोडे, राहुरी तालुकाध्यक्ष, धनगर समाज संघर्ष समिती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com