तारांकित प्रश्नानंतरही आंबीदुमाला तलाठी कार्यालय बंदच

तारांकित प्रश्नानंतरही आंबीदुमाला तलाठी कार्यालय बंदच

घारगाव |वार्ताहर| Ghargav

संगमनेर तालुक्यातील आंबी दुमाला येथील तलाठी कार्यालय तलाठी नियमित येत नसल्याने ग्रामस्थांची कामे खोळंबली आहेत. तलाठी कार्यालय असून अडचण, नसून खोळंबा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामस्थ तलाठी कार्यालयात हेलपाटे मारून वैतागून गेले आहेत. अनेकदा तक्रारी करूनही कुठलीही सुधारणा होत नसल्याने वरिष्ठांनी लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

संगमनेर तालुक्याच्या पठारभागात आंबी दुमाला तलाठी कार्यालयास कुरकुटवाडी, म्हसवंडी असे तीन मोठे गावे जोडलेले आहेत. शेतकरी व ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये म्हणून येथे तलाठी कार्यलय उघडले आहे. 2019 साली तलाठी कार्यालय आंबी दुमाला येथे कायमस्वरूपी एका तलाठ्याची नियुक्ती करण्यात आली. मात्र संबंधित तलाठ्याने दोन तीन महिन्यानंतर वैद्यकीय कारणे दाखवत सेवावर्ग करून अकोले तालुक्यातील मेहंदुरी येथे पदभार घेतला. दरम्यान, अनेक महिने हे तलाठी कार्यालय बंद होते. या घटनेकडे तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून विद्यमान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारचे लक्ष वेधले होते.

अतिरिक्त पदभारावरच या कार्यालयाचा पदभार सुरु असल्याची बाब त्यांनी सभागृहात मांडली होती. हे कार्यालय नियमितपणे सुरु होईल असे आश्वासन माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिल्यानंतर येथे संबंधित तलाठ्याचे सेवावर्ग आदेश रद्द करून त्यांना पुन्हा आंबी दुमाला येथे मूळ ठिकाणी पदभार देण्यात आला. मात्र नेमणूक केलेले तलाठी आठवड्यातून ते पंधरा दिवसातून एकदा कार्यालयात येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे असून शेतकर्‍यांना वेळेत विविध योजनांसाठी लागणारे दाखले मिळत नसून वारसनोंदीची कामे खोळंबली आहेत. या परिसरात अवैध खोदकाम वाढत आहे.

या परिसरातून अवैधरित्या मुरूम मातीची वाहने धावत असतात. अतिरिक्त पदभार स्वीकारलेल्या तलाठ्यांच्या कार्यकाळात जी कामे रखडली आहेत ती कामे त्यांच्याकडूनच करून घ्यावे असेही ग्रामस्थांना तलाठ्याकडून सांगण्यात येते आहे. मध्यंतरीच्या काळात एका आदिवासी कुटूंबाच्या घराचे जळीत झाले असताना पंचनामा दुसर्‍या दिवशी करण्यात आला. त्यांच्या सहीसाठी भूतांबरे यांना आंबी दुमाला येथून 50 किलोमीटर संगमनेर येथे बोलविण्यात आले असल्याचे भूतांबरे यांनी सांगितले. संबंधित तलाठ्याची चौकशी व्हावी व कायमस्वरूपी तलाठी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

याबाबत प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे यांना विचारले असता पीएम किसान योजनेचे काम चालू असल्याने सर्व तलाठी यांना संगमनेर कार्यालयात थांबण्याचे आदेश असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र गेली सहा महिने सबंधित तलाठी आंबीदुमाला कार्यालयात न जाता संगमनेर येथून आपले काम पाहत असल्याने वरिष्ठ अधिकार्‍यांचा प्रशासनावर वचक नसल्याचे बोलले जात आहे.

महसूलमंत्री विखे यांच्याकडून कारवाईची अपेक्षा

विद्यमान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारचे लक्ष वेधत संबंधित तलाठ्याचे सेवावर्ग आदेश रद्द करून त्यांना पुन्हा आंबी दुमाला येथे मूळ ठिकाणी पदभार देण्यात आला. मात्र काहीकाळ सबंधित तलाठी आंबी-दुमाला कार्यालयात आला आणि नंतर संगमनेर येथून कारभार हाकण्यास सुरुवात केली. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती. मात्र शिंदे सरकारच्या काळात राधाकृष्ण विखे पाटील महसूलमंत्री असून ते सबंधित प्रकारची चौकशी करून ग्रामस्थांना योग्य न्याय देतील अशी अपेक्षा ग्रामस्थांना आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com