आंबी-अंमळनेर येथील मोबाईल टॉवर असून अडचण नसून खोळंबा

वाड्या-वस्त्यांवरील ग्राहकांची गैरसोय || अन्यथा टाळे ठोकणार
आंबी-अंमळनेर येथील मोबाईल टॉवर असून अडचण नसून खोळंबा

आंबी |वार्ताहर| Ambi

आंबी व अंमळनेरकरांच्या सेवेत काही महिन्यांपूर्वी जिओ कंपनीचा टॉवर कार्यान्वित झाला. याचे सर्व स्तरातून स्वागत झाले. मात्र याच गावातील वाड्या आणि वस्त्यांवरील मोबाईल धारकांना या टॉवरचा काडीमात्र फायदा होताना दिसत नाही. या भागात सदर टॉवरची रेंज पोहोचलीच नाही. त्यामुळे हा टॉवर पांढरा हत्ती बनतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून आंबी-अमळनेर परिसरात मोबाईल टॉवर व्हावा, ही मोबाईल धारकांची मागणी होती. रेंज नसल्यामुळे अनेक शासकीय, निमशासकीय, बँका यांच्या कार्यालयांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. टॉवर सुरू झाल्यामुळे त्यांची समस्या सुटली. मात्र वाड्या-वस्त्यांवरील मोबाईल धारक रेंजपासून वंचितच आहेत.

आंबी-अंमळनेर परिसर बागायती पट्टा असल्याने बहुतांश ग्रामस्थ शेतातच वस्त्या करून राहतात. गावापासून सुमारे दोन ते तीन किलोमीटर परिसरातील नागरिकांना रेंज उपलब्ध होत नसल्याने अनेकांनी अंमळनेर ग्रामपंचायतीकडे नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान संबंधित कंपनीच्या अधिकार्‍यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.

आंबी-अंमळनेर येथील टॉवरची सध्या असून अडचण, नसून खोळंबा असे म्हणण्याची वेळ मोबाईल धारकांवर आली आहे. याबाबत कंपनीकडून लवकरात लवकर दखल न घेतल्यास टॉवरला टाळे ठोकू. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास कंपनी जबाबदार राहील, असा इशारा धनगर समाज संघर्ष समितीचे तालुकाध्यक्ष जालिंदर रोडे यांनी दिला आहे.

रेंज संदर्भात वाड्या-वस्त्यांवरील मोबाईल धारकांनामधून अनेक तक्रारी आल्या आहेत. याबाबत ग्रामपंचायतीमार्फत जिओ कंपनीच्या अधिकार्‍यांशी सर्वत्र रेंज उपलब्ध करण्यासंदर्भात चर्चा करणेबाबत दक्षता घेत आहोत.

- अरुणाताई जाधव, सरपंच, अंमळनेर

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com