
संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner
निवडणूक निकालावरून तालुक्यातील अंभोरे गावामध्ये दोन गटात बुधवारी सायंकाळी जोरदार हाणामारी झाली. दोन्हीकडून परस्परविरोधी फिर्याद देण्यात आल्याने 30 जणांवर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
याबाबत संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी देण्यात आल्या. पहिली फिर्याद जनसेवा मंडळाच्या (विखे गट) सचिन सपत खेमनर (रा. शिकारे वस्ती, अंभोरे यांनी दिली. या फिर्यादीमध्ये त्यांनी म्हटले आहे की, शुभम भास्कर जर्हाड (रा. आश्वी) याने मंगळवारी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास आपला चुलत भाऊ प्रकाश गणपत खेमनर याला शेतकरी विकास मंडळाकडून उमेदवारी करणार्या दगडू बिरू खेमनर यांचा पराभव झाल्याचा राग मनात धरून हाताच्या चापटीने मारले.
यावेळी त्याच्यासोबत असलेल्या बाळासाहेब दगडू खेमनर यांनी आपल्याला जीवे ठार मारण्याची धमकी देत शिवीगाळ केली. यावेळी नारायण सहादु खेमनर, रंगनाथ सहादु खेमनर, हरिभाऊ सहादु खेमनर, सहादु दामु खेमनर, राधा दामु खेमनर, शरद राघु खेमनर, भरत राघु खेमनर, भारत गोविंद जर्हाड, कोंडाजी हनुमंत वाघमोडे, नारायण कोंडाजी वाघमोडे, बाळासाहेब दगडू खेमनर या बारा जणांनी आपल्या घरासमोर गैरकायद्याची मंडळी गोळा केली व चुलत भाऊ, चुलते यांना शिवीगाळ दमदाटी करीत लाथाबुक्क्यांनी काठीने व हातात दगड घेवून वाहनाच्या कीचेनचे असलेल्या कटरने मारून दुखापत केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी 12 जणांच्या विरोधात बेकायदा जमाव जमवून दंगल घडवणे, प्राणघातक शस्त्रांनी हल्ला करून जखमी करणे, धमकी देणे, शिवीगाळ करणे व प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय दंड संहिता कलम 143, 147, 149, 324, 323, 504, 506 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37 (1) (3) चे उल्लंघन अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार सय्यद करत आहे.
दुसरी फिर्याद शेतकरी विकास मंडळाच्या कोमल शरद खेमनर यांनी दिली. या फिर्यादीत म्हटले आहे की, आपला भाया नारायण खेमनर यांचा ग्रामपंचायत सदस्यपदाच्या निवडणुकीत विजय झाल्यानंतर दुपारी साडेचारच्या सुमारास गावातील मारुती मंदिराच्या समोर उभे होते. त्यावेळी श्रावण गोविंद खेमनर व प्रकाश गणपत खेमनर हे दोघे तेथे आले व त्यांनी नारायण खेमनर यांना तु निवडून कसा आलास? तुझ्याकडे पाहुन घेतो अशी दमदाटी करीत त्यांना शिवीगाळ केली.
त्यानंतर सपत गोविंद खेमनर (विजयी सदस्य), सचिन संपत खेमनर, अक्षय श्रावण खेमनर, अशोक गोविंद खेमनर, गणपत गोविंद खेमनर, अजय अशोक खेमनर, योगेश संपत खेमनर, अभय श्रावण खेमनर, ज्योतिबा नामदेव जगनर, पंढरीनाथ गंगाराम वाघमोडे, नारायण गंगाराम वाघमोडे, मंगल संपत खेमनर, गोविंद सखाराम खेमनर, सविता अशोक खेमनर, दीपाली प्रकाश खेमनर व अनुराधा सचिन खेमनर (रा. अंभोरे) यांनी एकत्र येवून आपणास व आपले पती शरद खेमनर, भाया नारायण खेमनर, चुलत सासरे सहादु दामु खेमनर व सासरे राघु दामु खेमनर यांना शिवीगाळ दमदाटी करीत लायाबुक्क्यांनी काठीने बेदम मारहाण केली.
या फिर्यादीवरुन संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात वरील 18 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शेख करत आहे.