
वैजापूर |प्रतिनिधी| Vaijapur
महाराष्ट्रातील कंपन्या, कार्यालयाबरोबरच राज्यातील पाणी सुद्धा गुजरातला पळवण्याचा घाट या सरकारने घातला असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.
शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पदयात्राही काढण्यात आली. या सरकारच्या काळात महाराष्ट्रातील पाणी देखील गुजरातला नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. गद्दारी करताना खोके स्वीकारून या पैशाचा वापर ग्रामपंचायत व सोसायटी निवडणुकीत केला आहे. हजारो कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचा हे लोक दावा करता; परंतु उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना हा निधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
या सरकारच्या काळात महापुरूषांचा अपमान करण्याचा सपाटा सुरू आहे. अतिवृष्टीसाठी शेतकर्यांसाठी 3800 कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात 700 कोटी रूपयांचा निधी मिळाला. विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर हा निधी देण्याचे सरकारने मान्य केले. एकट्या मराठवाड्यासाठी 1500 कोटी रुपये मिळणार आहे. एमएसइडीचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न सरकारने चालवल्याने कर्मचार्यांनी संप पुकारला आहे. या संपाला महाविकास आघाडीचा पाठींबा असल्याचे त्यांनी सांगितले.
या मेळाव्यात बाजार समितीचे माजी सभापती प्रतापराव धोर्डे, पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजी आधूडे, पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रभाकर बारसे, पंचायत समितीचे माजी सदस्य आण्णासाहेब चौधरी, जयश्री बोरनारे यांच्यासह विविध गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक व तसेच मुस्लिम कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचा सत्कार अंबादास दानवे व चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी आ. भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, सहसंपर्कप्रमुख आसाराम रोठे, उपजिल्हाप्रमुख अविनाश गलांडे, संजय निकम यांची समयोचीत भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका प्रमुख सचिन वाणी, सुत्रसंचलन प्रशांत शिंदे यांनी केले. तर आभार युवासेना तालुकाप्रमुख विठ्ठल डमाळे यांनी मानले.