विधानसभा अध्यक्ष नार्वेकर पक्षपाती

विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आरोप
 अंबादास दानवे
अंबादास दानवे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभेचे अध्यक्ष पक्षपाती वागत आहेत. खरे तर त्यांचे वैधानिक पद आहे. न्याय देण्यासाठी त्यांना नेमले आहे. पण ते राजकीय दृष्टीने काम करतात, असा थेट आरोप विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी शुक्रवारी येथे केला. मात्र, त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे थेट नाव घेण्याचे टाळले.

नगर शहरातील गणेश मंडळांना भेटी देण्यासाठी विरोधी पक्ष नेते दानवे शुक्रवारी नगरला आले होते. यावेळी दानवे यांनी शिक्षणाचे खासगीकरण व अन्य विविध मुद्यांवर केंद्र व राज्य सरकारवर टीका केली. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटातून फुटून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात गेलेल्या 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुनावणीस विलंब होत आहे. विधानसभेचे अध्यक्षपद हे मॅजिस्ट्रियल म्हणजे वैधानिक पद आहे.

या पदाच्या माध्यमातून त्यांनी न्याय देणे अपेक्षित आहे. पण तसे न करता ते राजकीयदृष्टीने काम करीत आहेत. आधीच्या सरकारने निर्माण केलेली व्यवस्था बाजूला करण्याचे काम केंद्र व राज्य सरकार करीत आहे. विमान व रेल्वेसेेवांचे खासगीकरण करून दोन्ही सरकारे स्वतःवरील जबाबदारी झटकत असून ते चुकीचे आहे.

शिक्षणाचे काही ठिकाणी खासगीकरण झाले तर त्याबाबत दुमत असणार नाही. पण सरसकट सर्व सरकारी शाळा व शैक्षणिक संस्थांचे खासगीकरण झाले तर सर्वसामान्य मुलांना व त्यांच्या पालकांना लाखभर रुपयांची फी परवडणार नाही व ती मुले शिक्षणापासून वंचित राहतील, असे स्पष्ट करून दानवे म्हणाले, जिल्हा परिषद वा महापालिकांच्या सर्वच शाळा खराब नाहीत. त्यांच्याही अनेक दर्जेदार शाळा आहेत. तेथे सर्वसामान्यांची मुले शिकतात. त्यामुळे सरसकट सर्व शाळा खासगीकरण करण्याचा सरकारचा निर्णय चुकीचा आहे. शाळा दत्तक घेण्याच्या माध्यमातून त्या ताब्यात घेऊन तेथे स्वतःच्या शाळा सुरू करण्याच्या प्रकारातून सर्वसामान्यांना शिक्षण दुरापास्त होईल, असा दावाही दानवेंनी केला.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com