कार्यकर्त्यांच्या आडून कोल्हे व काळेंचे एकमेकांवर आरोप

कार्यकर्त्यांच्या आडून कोल्हे व काळेंचे एकमेकांवर आरोप

नगराध्यक्ष वहाडणे हेच सत्ताधारी असल्याचा आ.काळेंना विसर : निखाडे

कोपरगाव (प्रतिनिधी) - शहराचा विकास व्हावा ही प्रामाणिक इच्छा कोल्हे गटाची असून त्यासाठीच प्रत्येक ठरावाला मंजुरी दिलेली आहे. पण आमदार काळे यांना कोपरगाव नगरपालिकेत कोण सत्ताधारी आहे याचाच विसर पडला आहे. कारण नगराध्यक्ष हे त्यांच्याच हातातील बाहुले आहे. त्या 28 कामांची एकत्रित गुंतागुंत होती म्हणूनच ही कामे प्रथम जिल्हाधिकारी, त्यानंतर उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात गेली आणि न्यायमुर्तींनी त्या कामाला स्थगिती दिली, असे प्रतिपादन उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे यांनी केले आहे.

निखाडे यांनी पत्रकात म्हटले आहे, आजवर कोपरगाव शहर विकासासाठी तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी कोट्यवधी रुपये खर्चाचे प्रस्ताव शासन दरबारी पाठवून त्यातील बहुतांशी कामांना निधी मिळवला आहे. उलट आमदार काळे यांना गेल्या दोन वर्षात त्यांच्या महा विकास आघाडी शासनाकडून पुरेशा प्रमाणात निधी मिळवता आलेला नाही. याचे शल्य त्यांना बोचत असल्याने त्यांची सतत कोल्हे गट व त्यांच्या नगरसेवकळ विरुद्ध तक्रार असते. आमदार काळे यांची टीका निरर्थक आणि ‘जखम मांडीला मलम शेंडीला’ अशीच आहे. उलट तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी शहर विकासात कुठे आडकाठी आणायची नाही म्हणून आम्हा सर्व नगरसेवकांना त्यांचे सतत सांगणे असते. आणि त्यानुसारच पालिका सभागृहात आम्ही वेळोवेळी वागत आलेलो आहे.

आजवर नगराध्यक्षांना व त्यांच्या शहर विकासाच्या ठरावाला साथ दिलेली आहे. आमदार काळे यांनी अगोदर अभ्यास करावा मगच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडाव्या. ती 28 कामे एकत्र ठेवू नये म्हणून आमची मागणी होती पण नगराध्यक्ष व त्यांच्या सहकार्‍यांना स्वार्थ साधायचा असल्यानेच त्यांनी ती एकत्रित ठेवली व त्यावर पालिका सभागृहात स्वतंत्र चर्चा होऊ दिली नाही. व त्यासाठी मंजुरी मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. स्वतंत्र चर्चेची आमची मागणी नगराध्यक्ष व आमदार काळे यांनी धुडकावून लावली असे उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे यांनी शेवटी म्हटले आहे.

पालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आमदार काळे कोल्हे गटाला जनतेच्या दरबारात मुद्दामहून बदनाम करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे. सवंग लोकप्रियतेच्या प्रसिद्धीसाठी प्रयत्न करून वेगवेगळी विधाने करून शहरातील नागरिकांना बुचकळ्यात पाडत आहेत.

- उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे.

लोकप्रनिधींवर टीका करणारांनी आपली लायकी तपासावी - पहाडे

कोळपेवाडी (वार्ताहर) - आपल्या प्रभागातील गटार करता आली नाही त्यांची विकासाचे व्हिजन असलेल्या आमदार आशुतोष काळेंवर टीका करायची लायकी आहे का ? अशी खोचक टीका मंदार पहाडे यांनी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांच्यावर केली आहे.

दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात पहाडे यांनी पुढे असे म्हटले आहे की, मागील साडेचार वर्षात आपले काय काम आहे हेच कोल्हे गटाच्या सत्ताधारी नगरसेवकांना समजले नाही. जनतेने शहर विकासासाठी निवडून दिले फक्त निवडूनच दिले नाही तर बहुमत देखील दिले. मात्र आपल्या नेत्याच्या आदेशावरून कोपरगाव शहराचा विकास होवूच द्यायचा नाही असा पवित्रा घेणार्‍या कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी नेहमीच शहरविकासात खीळ घातली आहे. त्यामुळे शहरातील जनतेचा भ्रमनिरास झाला असून येणार्‍या निवडणुकीत जनतेपुढे कोणत्या तोंडाने जायचे याची पंचाईत झाल्यामुळे ते आता बरळत आहे.

कोपरगाव नगरपरिषदेत बहुमत कोल्हे गटाचे, उपनगराध्यक्ष कोल्हे गटाचा, सगळ्या कमिट्यांचे अध्यक्ष कोल्हे गटाचे, सर्व कमिट्यांचे अधिकार यांच्याकडे असतांना देखील विकासकामांना पाठिंबा देण्याऐवजी त्यांनी आजवर विकासकामांना विरोधच केला आहे. विकासाचे व्हिजन असलेले आमदार आशुतोष काळे यांनी विकासकामांना पाठिंबा देण्यासाठी साठी नगराध्यक्षांना पाठिंबा दिला होता. परंतु सगळ्या कमिटीचे अध्यक्ष यांचे आहे. त्यांच्या अध्यक्षांच्या सुचननेनुसारच काम चालते मात्र विकासाशी देणघेण नसलेल्या कोल्हे गटाच्या नगसेवकांनी आजवर कमिटीच्या मिटिंग घेतल्या नाही.

मागील निवडणुकीत प्रचारासाठी विद्यमान मुख्यमंत्री आणून देखील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेला पराभव फारच जिव्हारी लागला. व निष्क्रिय माजी लोकप्रतिनिधींना विधानसभा निवडणुकीत शहारतील जनतेने त्यांची जागा दाखवून दिल्यामुळे त्यामध्ये अजून भरच पडली. शहरातील नागरिकांना विकासापासून वंचित ठेवण्याच्या कोल्हेंच्या आदेशावर कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी विकासकामांना विरोध केला मात्र त्यांच्या विरोधाला न जुमानता जिल्हाधिकार्‍यांनी विकासकामांना परवानगी दिल्यामुळे त्यांचा आणखीनच तिळपापड झाला. त्यामुळे सत्तेच्या मस्तीत न्यायालयात जावून 28 कामांना स्थगिती आणार्‍यांचा बुरखा फाडल्यामुळे त्यांचे खरे रूप शहरवासियांना दिसून आले असल्यामुळे त्यांची पंचाईत झाली आहे. त्यामुळे लायकी नसलेले बरळत असून बोलके पोपट बरळतात सुद्धा हे आजच माहिती झाले असल्याचे पहाडे यांनी शेवटी म्हटले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com