पाथर्डीत प्लास्टिक विरोधी कारवाईत भेदभावाचे आरोप

संतप्त व्यापार्‍यांचा नगरपालिकेवर मोर्चा
पाथर्डीत प्लास्टिक विरोधी कारवाईत भेदभावाचे आरोप

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

प्रदूषण नियंत्रन मंडळ व पालिका पथकाच्या वतीने आज दुपारी पाथर्डी शहरातील काही दुकानांवर धाडी टाकून दुकानदारांकडून मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकच्या पिशव्या व बंदी असलेले प्लास्टिकचे साहित्य जप्त करण्यात आले. परंतु ही कारवाई भेदभावपुर्वक करण्यात आल्याचा आरोप करत चिडलेल्या व्यापारी वर्गाने अचानक बाजारपेठ बंद करत पालिका कार्यालयावर मोर्चा काढला. तेथे तासभर धरणे आंदोलन केले. पालिका अधिकार्‍यांना धारेवर धरत जाब विचारण्यात आला.

शहर हद्दीतील दुकानातून प्लास्टिक बंदी असताना प्लास्टिक वापरल्या जात असल्याच्या गोपनीय माहितीवरून अहमदनगर प्रदूषण नियंत्रण मंडळ व पाथर्डी पालिकेच्या संयुक्त कारवाईत आज दुपारी सहा दुकानांवर धाडी टाकून दुकानांमधील प्लास्टिक पिशव्या ग्लास पत्रवाळ्या आदींसह बंदी असलेले व इतरही प्लास्टिकचे साहित्य मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आले.

यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच पालिकेच्या पथकाने व्यापार्‍यांना प्लास्टिक बंदी बाबत यापूर्वी कुठलीही पूर्व सूचना, नोटीस अगर जनजागृती न करता थेट बळजबरीने दुकानात प्रवेश केला. व्यापार्‍यांना अरेरावी करून मोठ्या प्रमाणावर साहित्य जप्त केल्याचा आरोप करत व्यापार्‍यांनी दुपारी दोनच्या सुमारास बाजारपेठेतील दुकाने अचानकपणे बंद करून पालिका कार्यालयाकडे धाव घेतली.

यावेळी व्यापार्‍यांनी जमाव करून कार्यालयात उपस्थित असलेले कर्मचारी व स्वच्छता निरीक्षक दत्तात्रय ढवळे यांना सदरील कारवाई करताना भेदभाव केला जात असून सदरील कारवाई कोणत्या पुढार्‍याने करावयाला लावली? तुम्हाला विशिष्ट लोकांचीच दुकाने दिसतात का ? अशा प्रश्नांची सरबत्ती करत सदरील कारवाई चुकीची असल्याचा आक्षेप नोंदवला. दरम्यान या पथकातील एका कर्मचार्‍याकडून व्यापार्‍यांनी कार्यवाहीसाठी केलेल्या यादीची प्रत घेऊन ती उपस्थित व्यापार्‍यांना दाखवली त्या प्रतीमध्ये ठराविक दुकानदारांची माहिती लिहिलेली होती.

यामुळे काही काळ पालिका कार्यालयात तणावाची वातावरण निर्माण झाले होते. यावेळी संतप्त व्यापार्‍यांनी स्वच्छता निरीक्षक यांना यापूर्वी धाडी टाकून जप्त केलेले प्लास्टिकचे साहित्याचे काय केले ? त्याचा खुलासा आम्हाला द्या असा जाब विचारला.

व्यापारी पालिके मध्ये पोहोचण्या अगोदर त्या ठिकाणी माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड हे त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी व्यापार्‍यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी माजी नगरसेवक रामनाथ बंग, मुकुंद गर्जे, व्यापारी सुशील पटवा, सचिन भंडारी, सुभाष चोरडिया, सतीश भंडारी, अजय भंडारी, जानमल देसरडा, यांच्यासह बहुसंख्य व्यापारी वर्ग तसेच पालिका कार्यालयीन अधीक्षक आयुब शेख, सोमनाथ गर्जे, स्वछता निरीक्षक दत्ता ढवळे तसेच अहमदनगर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कक्ष अधीकारी रवींद्र पाटील आदी उपस्थित होते.

भाजपचे सरकार असताना कारवाई ?

अभय आव्हाड यांनी खा. सुजय विखे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना फोन लावून पालिका व प्रदूषण विभागाच्या अधिकार्‍यांनी व्यापार्‍यांवर कारवाई करू नये यासाठी गळ घातली. मात्र यावेळी उपस्थित असलेल्या एका व्यापार्‍याने अभय आव्हाड व रामनाथ बंग यांना भाजपचे सरकार असताना अशी कारवाई कशी होते असा प्रश्न विचारला असता उपस्थित व्यापारी आंदोलकात मोठा हशा पिकला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com