आळेफाटा येथून चोरी झालेल्या मोबाईलची परदेशात विक्री

आळेफाटा येथून चोरी झालेल्या मोबाईलची परदेशात विक्री

घारगाव |वार्ताहर| Ghargav

आळेफाटा (जुन्नर) येथील मोबाईल शॉपी फोडून तब्बल 140 नवीन मोबाईल चोरी करून त्यांची कोलकत्तामार्गे दक्षिण आफ्रिका, नेपाल व बांगलादेशमध्ये विक्री झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. आळेफाटा पोलिसांनी आंतरराजीय टोळीतील तीन आरोपींना अटक केली असून दोघे जण पसार आहेत. आरोपी राजस्थान व गुजरात राज्यातील असून आरोपींकपींडून 14 लाख 50 हजार व पिकअप जीप असा 19 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी दिली.

ईश्वरलाल हिंमतलाल इरागर (वय 32, रा. विरार, जि. पालघर, मूळ रा. सिरोही राजस्थान), महावीर जोरसिंग कुमावत (वय 35, रा. विरार, जि. पालघर, मूळ पाली, राजस्थान) व आवेश अब्दुल सत्तार कपाडिया (वय 32, रा. चौकबाजार सिंधीवाड, सुरत) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

आळेफाटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि.5) पहाटेच्या सुमारास चेतन गुगळे यांचे आळेफाटा चौकापासून जवळच असलेल्या मोबाइल शॉपीचे अज्ञात चोरट्यांनी शटर उचकटून विविध कंपन्यांचे 140 च्या वर मोबाइल व सीसीटीव्ही कॅमेरा असा 13 लाख 13 हजार रुपयांच्या वस्तू लंपास केल्या होत्या. याबाबत आळेफाटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर व सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर यांनी तपास सुरू केला.

आळेफाटा चौकातील सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत गुन्ह्यात वापरलेली जीप (क्रमांक एम एच 48 एन जी 2380) ही या परिसरात आढळून आली. सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर व त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारामार्फत विरार येथून ईश्वरलाल इरागर व महावीर कुमावत यांना, तसेच गुन्ह्यात वापरलेली जीप ताब्यात घेतली. अधिक तपास केला असता त्यांनी शाहीद अब्दुल सत्तार कपाडिया व संजय यादव ऊर्फ म्हात्रे यांच्यासह आळेफाटा येथील मोबाइल शॉपी फोडल्याची कबुली दिली. अधिक तपास केला असता यातील पसार आरोपी शाहीद कपाडिया याने सदरचे मोबाईल हे त्याचा भाऊ आवेश कपाडिया यास विकल्याचे सांगितले.

सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर, पोलिस हवालदार विनोद गायकवाड, पंकज पारखे व अमित माळुंजे यांनी सुरत येथे जाऊन आवेश कपाडिया यास ताब्यात घेतले. त्याने हे मोबाइल विकत घेतल्याचे व हे मोबाइल दक्षिण आफ्रिका, नेपाळ व बांगलादेश येथे एका व्यक्तीमार्फत विकल्याचे सांगितले. त्याच्याकडून 14 लाख 50 हजार रुपये ताब्यात घेत त्याला अटक केली.

ही कामगिरी जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक नितेश घट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर, सहायक फौजदार चंद्रशेखर डुंबरे, पोलिस हवलदार विनोद गायकवाड, पंकज पारखे, अमित मालुंजे, नवीन अरगडे, हनुमंत ढोबळे, प्रशांत तांगडकर, सुनील कोळी यांनी केली.

..तर मोबाईल ट्रेस करणे अशक्य

भारतात चोरलेले मोबाईल दक्षिण आफ्रिका, नेपाल व बांगलादेश आणि तिथून इतर देशांमध्ये पाठवले जातात. जेव्हा मोबाइल चोरीची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली जाते, तेव्हा पोलीस चोरी झालेल्या मोबाईलचा IMEI नंबरद्वारे मागोवा घेण्याचा प्रयत्न करतात. जो कोणी त्या IMEI क्रमांकासह मोबाईलमध्ये सिम टाकतो, पोलिसांना सिम व्यक्तीचे नाव, पत्ता आणि लोकेशन समजतं. चोरलेले मोबाईल जर देशातच असेल अशा लोकांना पोलीस पकडू शकतात. मात्र चोरीला गेलेला मोबाईल परदेशात गेला, तर त्याचा शोध घेणे शक्य नाही. मोबाईल चोरी करणार्‍या टोळीच्या लोकांनाही याची जाणीव आहे, त्यामुळे चोरलेले मोबाईल कोलकत्तामार्गे दक्षिण आफ्रिका, नेपाल व बांगलादेशमध्ये पाठवून विकले जातात.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com