दारु दुकानाबाबत ग्रामपंचायत करणार तक्रार

राज्य उत्पादन शुल्क व भूमी अभिलेखची लुपाछुपी होणार उघड
दारु दुकानाबाबत ग्रामपंचायत करणार तक्रार

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

कासारा दुमाला येथील गावठाण हद्दीत सुरु असलेले देशी दारुचे दुकान भूमी अभिलेख खात्याचा बनावट दाखल्याच्या आधारे सुरु असल्याच्या संशयावरुन कासारादुमाला ग्रामपंचायतच आता राज्य उत्पादन शुल्क अधिकार्‍यांनी या दुकानाची चौकशी करुन कारवाई करावी, अशी मागणी पत्राद्वारे करणार आहे. त्यामुळे आता राज्य उत्पादन शुल्क व भूमी अभिलेख खात्याचे अधिकारी यांची लुपाछुपी आता समोर येणार आहे.

कासारा दुमाला येथील वादग्रस्त देशी दारू दुकान चालकाने भूमिअभिलेख खात्याचा बनावट दाखला राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकार्‍यांना देऊन परवाना घेतला. याबाबत तक्रारी राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकार्‍यांकडे करूनही या अधिकार्‍यांनी या बनावट दाखल्याची साधी चौकशीही केली नाही. यामुळे या अधिकार्‍याच्या छुप्या सहकार्यामुळेच हे देशी दारू दुकान सुरू आहे. कासारा दुमाला येथे गेल्या काही दिवसांपासून हे देशी दारू दुकान बेकायदेशीर रित्या सुरु आहे.

या दुकानाबाबत ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी केल्या आहेत. या दुकानाची जागा बदलताना दुकान मालकाने उत्पादन शुल्क अधिकार्‍यांकडे खोटे कागदपत्र सादर केले होते. दुकानाच्या लायसन साठी लागणारा भुमिअभिलेखचा खरा दाखला देण्याऐवजी बनावट दाखला उत्पादन शुल्क कार्यालयाकडे सादर करण्यात आला होता. एका जागरूक नागरिकाने भुमिअभिलेख खात्याकडे याबाबत चौकशी केली असता या कार्यालयातून असा कोणत्याही प्रकारचा दाखला देण्यात आला नाही असे पत्र भुमी अभिलेख कार्यालयाकडून या नागरिकास देण्यात आले. संबंधित दुकान चालकाने हा बनावट दाखला बाहेर बनवून भुमिअभिलेखने हा दाखला दिला असल्याचे भासविले होते.

याबाबत भुमिअभिलेख खात्याचे अधिकारी श्री. सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला असता या दाखल्या संदर्भात आमच्याकडे तक्रारी आल्या होत्या. आमच्या कार्यालयातून असा कोणत्याही प्रकारचा दाखला देण्यात आलेला नाही. उत्पादन शुल्क खात्याने आमच्याकडे विचारणा केली तर आम्ही त्यांना असे पत्र देऊ. पुढील कारवाई करण्याचा अधिकार राज्य उत्पादन शुल्क खात्याचा आहे, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान बनावट दाखला देऊन दारू दुकानासाठी परवाना घेतल्याचे माहिती असतानाही राज्य उत्पादन शुल्क च्या अधिकार्‍यांनी संबंधित देशी दारू दुकानाच्या मालकावर अद्याप कारवाई केलेली नाही. यामुळे उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. या अधिकार्‍यांनी खोटा दाखला दिल्याप्रकरणी देशी दारू दुकानाच्या मालकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आता पुढे येऊ लागली आहे. या देशी दारू दुकानाबाबत तक्रारी वाढल्याने आता ग्रामपंचायत प्रशासन सतर्क झाले आहे. त्यांनी दोन दिवसापूर्वी दुकान चालकाला नोटीस देऊन हे दुकान बंद करण्याबाबत सूचना केल्या आहेत.

ग्रामपंचायतीच्या वतीने आता उत्पादन शुल्क अधिकार्‍यांनाही या दारु दुकानच्या बाबत पत्र देण्यात येणार आहे. या दुकानाची जागा गावठाणात नाही व ग्रामपंचायतीने कोणत्याही प्रकारचा ना-हरकत दाखला दिलेला नाही. राज्य उत्पादन शुल्क खात्याने कागदपत्रांची चौकशी करावी व पुढील कारवाई करावी, असे पत्र राज्य उत्पादन शुल्कला देण्यात येणार आहे.

- रमेश गुंजाळ, ग्रामसेवक, कासारादुमाला

कोणालाही पाठीशी घालणार नाही, उत्पादन शुल्क च्या कार्यालयातून शहानिशा करूनच परवाने दिले जातात. या खात्याचे अधीक्षकांचे कडक लक्ष असते. आम्ही कोणालाही पाठीशी घालणार नाही, योग्य असेल तर ते कसे योग्य आहे हे पण सांगू अशी प्रतिक्रिया राज्य उत्पादन शुल्कचे उपअधिक्षक श्री. सराफ यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com