दारूने घेतला काळूचा बळी

दारूने घेतला काळूचा बळी

चासनळी |वार्ताहर| Chasnali

काळु लहानपासून लाडका, दारूचे दुकान हाकेच्या अंतरावर. दारूचे व्यसन कधी लागली ते कळलंच नाही. सकाळी चहा नसला तरी चालेल दारूचा उतारा लागणारच. नाहीतर हात पाय थरथर कापायची. दारूच्या व्यसनामुळे शरीरातील किडनी निकामी झाल्या. त्याच्या तीनही बहिणी आदिवासी समाजातील असून देखील चांगल्या कुटुंबात दिल्या असल्यामुळे त्यांनी भावासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले परंतु शरीर जर्जर झाल्यामुळे त्यांचे प्रयत्नही निष्फळ ठरले एकुलता एक मुलासाठी आईचा व बहिणीचा भावासाठी केलेला आकांत बघवत नव्हता. दारूने कुटूबाची केलेली फरपट आख्खा गाव पहात होता.

अत्यंत हलाखीत रोजंदारी करून एकुलता एक लेकराची सुखाची स्वप्न बघणार्‍या आईची ती आर्त हाक डोळ्यात पाणी आणणारी ठरली. दारुमुळे शरीर जर्जर झालेल्या अल्पवयीन काळूने प्राण सोडला. कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील माणकेश्वर नगर मधील आदिवासी समाजातील काळूला लहानपणापासून फक्त आईची माया मिळाली. वडिलांनी संन्यासाश्रम स्वीकारल्यामुळे त्यांची साथ मिळाली नाही. आईने आयुष्यभर मोलमजुरी करून एक मुलगा आणि तीन मुलींना लहानचे मोठे केले. काळू आज या जगात नसला तरी काळू सारखे असंख्य काळू त्याच्या मार्गावर आहेत.

काही तरुणपणीच दारुमुळे जग सोडून गेलेले आहेत. माणकेश्वर नगर मधील 20 ते 25 युवकांनी पंचविशीतच जगाला राम राम केला आहे. आजही बर्‍याच काळूंना सकाळी उतारा घेतल्याशिवाय चैन पडत नाही. मोल मजुरीला जाताना अगोदर मालकाकडून पैसे घेऊन दारूचा घोट नरड्यात पडल्याशिवाय कामच करता येत नाही. काही तर दिवसभर बाजार तळावर दारू पिऊन झोपलेले असतात. घरातील महिला भर उन्हात दिवसभर काम करतात. काही कुटुंबातील महिलांनी खंत व्यक्त केली की आमच्या पैशावर दिवसभर हिंडत असतात आणि रात्री दारू पिऊन घरी येतात. हे सांगताना त्यांच्या डोळ्यातील अश्रू बघवत नव्हते.

काही स्त्रिया आपल्या नवर्‍याच्या जाचाला कंटाळून निघून गेल्या त्यामुळे वैफल्यग्रस्त झालेले थोडेफार काम करून दिवसभर दारू पिऊन हिंडत असतात. चासनळीची उद्योगधंद्यांमध्ये भरभराट होत असली तरी ती आतून पुर्ण पोखरली जात आहे. मटका खेळण्यासाठी बाहेर गावावरून येणारी माणसं कोण आहेत हे कळत नाही. तरुण पिढी व्यसनाकडे वळली असून मागील महिन्यात त्यांनी गोडाऊन फोडून धान्य चोरले होते. चार पाच महिन्यात चासनळी मध्ये जेवढ्या घटना घडल्या त्या सर्व गावाबाहेरील व्यक्तीचा सामावेश होता हे असेच चालू राहिले तर असंख्य काळू निर्माण होऊन गावाचे गावपण राहणार नाही.

Related Stories

No stories found.