‘देशी’चे दाम दुप्पट झाल्याने ‘देशी’प्रेमींची नशा ‘उतरली’

‘देशी’चे दाम दुप्पट झाल्याने ‘देशी’प्रेमींची नशा ‘उतरली’

राहुरी फॅक्टरी |वार्ताहर| Rahuri Factory

‘देशी’चे दाम दुप्पटीपेक्षा अधिक झाल्याने ‘देशी’प्रेमींच्या आर्थिक अडचणीत झाली वाढ झाली आहे. चढ्या भावाने देशी खरेदी करावी लागत असल्याने आत ढकलण्यापूर्वीच तळीरामांची नशा आता ‘उतरली’ आहे.

करोनाच्या या संकट काळात सरकारने वारंवार हात धुण्याचे सांगितले. मात्र काही लोक या संकटकाळात मिळेल तिथे हात धुवून घेत आहेत. त्यामुळे करोना व्हायरसपेक्षाही हे मानवरूपी व्हायरस घातक ठरत आहेत.

करोनाकाळात रुग्णांच्या असहायतेचा फायदा घेत गोळ्या, औषध, इंजेक्शन, ऑक्सिजनच्या काळा बाजाराचे किस्से आपण रोज ऐकतोय. त्याबरोबरच आजार नसलेल्या सामान्य माणसांनाही मोठ्या प्रमाणात लुटण्याची मोहीम अनेकांनी उघडली आहे. सरकारने लागू केलेला लॉकडाऊन व त्यावेळेची संधी साधत अनेक महाभाग किराणा, भाजीपाला चढ्याभावाने विक्री करून लोकांना अक्षरशः लुटत आहेत.

जीवन आवश्यक गोष्टींच्या यादीत बसत नसल्या तरी काही गोष्टी अनेकांच्या जीवनात आवश्यक बनल्या आहेत. त्यात प्रामुख्याने दारू, तंबाखूजन्य पदार्थांचा समावेश आहे. ही गोष्ट हेरून या धंद्यात माहीर असणारे या संकटकाळात पुरेपूर हात धुवून घेत आहेत. गेल्या पंधरा दिवसात विदेशी दारूचे दाम तिप्पट झाले आहेत, तंबाखू पुडी व इतर तंबाखूजन्य गुटखा, मावा दुप्पट भावाने विकला जात आहे. त्यापाठोपाठ आता देशीदारूही दुपटीपेक्षा जास्त किंमतीला विकली जात असल्याने देशीप्रेमी चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

55 रुपये एरवी किंमत असणारी देशी क्वार्टर सध्या 125 रुपयांना विकली जात आहे. देशी जीवन आवश्यक नसली तरी काहींच्या जिवनात मात्र ती आवश्यक बनली असल्याने असे लोक मिळेल त्या भावात दारू पितांना जसे तोंड वाकडे करतात तसेच तोंड वाकडं करून चढ्या भावात देशी घेत आहेत.

चढ्याभावाने देशी विकणारेही घेणारे तोंड वाकडं करण्याशिवाय आपलं काही वाकडं करू शकत नाही, याची जाण असल्याने पाहिजे त्यांना अ‍ॅडजस्ट करून हा गोरख धंदा करत आहेत. याबाबत कोणी दखल घेतील किंवा नाही, माहीत नाही. मात्र, चढ्याभावाने देशी विकून आम्हाला लुटणार्‍यांना आमचा तळतळाट लागेल, अशी संतप्त प्रतिक्रिया एका देशीप्रेमीने व्यक्त केली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com