
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
नगर तालुका पोलिसांनी बुधवारी तालुक्यातील साकत, नेप्ती, अकोळनेर, निमगाव वाघा येथे सात ठिकाणी दारूवर कारवाई करून एक लाख 63 हजार रुपये किंमतीची देशी-विदेशी, हातभट्टी दारू जप्त करून नष्ट केली आहे. या प्रकरणी सात जणांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दत्तू महिपती पवार, नाना हरी पवार (दोघे रा. साकत), कलिम जैनुद्दीन शेख (रा. अकोळनेर), दिलीप कुमार फलके, सचिन नाथा पवार (दोघे रा. निमगाव वाघा), विलास हरिभाऊ पवार, राजू बाजीराव पवार (दोघे रा. नेप्ती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. नगर तालुक्यातील साकत, नेप्ती गावात वारंवार कारवाई करून देखील गावठी हातभट्टी दारू निर्मितीसह देशी-विदेशी दारूची विक्री केली जात आहे.
वारंवार कारवाई करून देखील तेच लोक दारू निर्मिती करून विक्री करतात. बुधवारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने साकत, नेप्ती, अकोळनेर, निमगाव वाघा शिवारात छापेमारी करून एकूण एक लाख 63 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून नष्ट केला आहे.