अक्षय तृतीया सणानिमित्त करा-केळीला मोठी मागणी

अक्षय तृतीया सणानिमित्त करा-केळीला मोठी मागणी

राहाता |वार्ताहर| Rahata

अक्षय तृतीया सणानिमित्त करा- केळीला मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे नागरिकांची करा केळी खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी होत आहे.

अक्षय तृतीया सण एक दिवसावर येऊन ठेपला आहे. अक्षय तृतीयाला मातीच्या करा केळीचे पूजन केले जाते. त्यामुळे बाजारात व शहरांमध्ये ठिकठिकाणी मातीच्या करा केळी विक्रीसाठी मोठ्या संख्येने दिसू लागल्या आहेत. राहाता व सावळीविहीर येथील गुरुवारच्या बाजारातही मोठ्या संख्येने कराकेळी विक्रीसाठी आल्याचे दिसून येत होते. तसेच नागरिक विशेषत: महिलांची गर्दी केली होती.

गेल्या काही दिवसापासून कुंभार कारागीर रात्रंदिवस मातीच्या करा केळी बनवून त्या बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. करा केळींना मागणी वाढली आहे.

अक्षय तृतीया सण हा ऐन उन्हाळ्यात येतो. करा केळीचे पूजन केल्यानंतर करा केळी हे अनेक ठिकाणी थंडगार पाणी पिण्यासाठी वापरले जातात. अक्षय तृतीया सणाला स्वर्गीय माता म्हणून लाल रंगाची केळी व स्वर्गीय पिता म्हणून काळ्या रंगाचे करा संबोधले जाऊन त्यांची पूजा केली जाते. करा केळी पूजेसाठी घेण्याची महिला वर्गामध्ये लगबग दिसून येत आहे. यंदा करा केळी यांच्या किंमतीही वाढल्याचे दिसून येत आहे. मात्र पूजेसाठी आवश्यक असल्यामुळे त्या खरेदी करण्याकडे नागरिकांचा, महिलांचा कल अधिक दिसून येत आहे.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयाला हिंदू धर्मात महत्त्व असल्यामुळे मोठ्या श्रध्देने पूजाविधी केले जातात. मातीच्या भांड्यात आंबा व इतर पूजा साहित्य ठेवून त्याची पूजा करण्याची प्रथा असल्यामुळे दरवर्षी नव्या करा-केळीचा उपयोग पूजेसाठी केला जातो. यासाठी लागणार्‍या करा-केळी कुंभार कारागीर एक-दीड महिना अगोदर करा-केळी तयार करण्याच्या कामाला लागतात. मातीत राख मिसळून एकजीव केलेल्या चिखलाला विजेच्या चाकावर ठेवून विविध आकारातील करा-केळी तयार करण्यात येतात. सुरुवातीला राखाडी रंगाच्या असलेल्या या करा-केळींना गेरू लावण्यात येत असल्यामुळे त्या लाल रंगाच्या होतात.

सध्या बाजारात तीन चार प्रकारच्या करा-केळी उपलब्ध आहेत. छोट्या, मध्यम आणि मोठ्या फॅन्सी आकारातील करा-केळी 59 ते 100 रुपये किंमतीत विक्री केल्या जात आहेत. यंदा अक्षय तृतीया उद्या शनिवार दिनांक 22 एप्रिल रोजी असल्याने येत्या दोन दिवसात ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. अक्षय तृतीयेच्या पूजेला घरोघरी लागणार्‍या करा-केळींची उपलब्धता केवळ राहाता परिसरात तयार होणार्‍या करा-केळींनी मोठ्या प्रमाणात मागणी होत असल्यामुळे गुजरात, अहमदाबाद व इतर शहरातूनही करा-केळी बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com