अकोल्यातील तरुणाई करतेय नगरमधील करोना रुग्णांना मदत

सोशल माध्यमाचा केला जातोय प्रभावी वापर
अकोल्यातील तरुणाई करतेय नगरमधील करोना रुग्णांना मदत

अकोले |प्रतिनिधी| Akole

सर्वत्र करोनाचा हाहाकार सुरू आहे. दिवसेंदिवस गंभीर होणार्‍या परिस्थितीमध्ये ऑक्सिजन बेड्स, व्हेंटिलेटर, प्लाझ्मा, रक्त, औषधे यांचा तुटवडा जाणवत आहे. अशा गरजू रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी तरुणाई पुढे सरसावली आहे.

करोना झालेल्या एका मित्राला प्लाझ्माची गरज असताना फेसबुकच्या माध्यमातून तो त्वरित उपलब्ध झाला. त्यावेळी या सर्वांनी विचार केला की अशा किती जणांना दररोज मदतीची गरज असेल आणि ह्याच गोष्टीतून प्रेरणा घेत देवेंद्र आभाळे, श्रेयस भांगरे, पूर्वीता वाकचौरे, आसिया शेख, शुभम जाधव, शिवराज भोर, राहुल जाधव, आदर्श उघडे आदिंनी हा ग्रुप सुरू केला आहे. रुग्ण त्यांना हवी असलेली मदत अहमदनगर करोना ग्रुपवर टाकतात व त्यांना अगदी काही मिनिटांत मदत मिळवून देण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला जातो. रेमडेसिवीरचा तुटवडा असताना जिथं जिथं शक्य असेल तिथं ही तरुणाई जाऊन पोहचली आणि मदतीचे हात पुढे केले.

सुरुवातीला फक्त अकोले-संगमनेर मधील रुग्णांचे मदतीसाठी फोन येत होते. नंतर संपूर्ण अहमदनगर हे मदतीचे जाळे पसरले आणि त्यासोबतच पुणे, नाशिक सारख्या शहरांमध्ये पण मदत कार्य चालू करण्यात आले. सावली फाऊंडेशनच्या सायली धनाबाई ह्या नेहमीच सर्वांच्या ऊर्जास्त्रोत राहिल्या आहेत, प्लाझ्मा दानासाठी सर्वतोपरी मदतीसाठीची प्रेरणा त्यांच्याकडूनच सर्वांना मिळत आहे. नगर जिल्हा वगळता इतर सर्वांना तत्पर मदत करण्यात थोड्या अडचणी येत असल्या तरी मदतकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे.

आज पर्यंत या ग्रुप मार्फत 45 प्लाझ्मा, 82 बेड, 35 ऑक्सिजन बेड, 37 व्हेंटिलेटर बेड मिळून देण्यात आले आहे. त्यासोबतच गोळ्या व औषधे ही उपलब्ध करून देण्यात आले आहे. सध्या प्लाझ्माचा प्रचंड तुटवडा जाणवत असून बरे झालेल्या रुग्णांनी पुढे यावे व कुणाचा तरी जीव वाचविण्यास हातभार लावावा. देशसेवा ही फक्त वर्दी घालूनच किंवा रक्त सांडूनच करता येते असे नाही तर रक्त दान करून देखील आपण देशसेवेत हातभार लावत असतो असे मत देवेंद्र आभाळे यांनी केले.

आम्ही समाज माध्यमांचा वापर करून एक नेटवर्क तयार केले आहे, गूगल फॉर्म तयार करून जे दाते आहेत त्यांच्याकडून स्वतःचे नाव, पत्ता, वय, रक्तगट व संपर्क असा फॉर्म भरून घेतला जातो, असे 400 पेक्षा जास्त दात्यांची माहिती आमच्याकडे जमा झालेली आहेत. त्यासोबत अनेक रुग्णालयांमध्ये आम्ही प्लाझ्मा दान करावा व लागल्यास संपर्क करावा, असे आवाहन करणारे फलक चिटकवून आलो आहे. कुणाला गरज असल्यास 9765695734 या क्रमांकावर संपर्क करावा.

- डॉ. पूर्वीता वाकचौरे

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com