तांभोळ शिवारात बिबट्यांमुळे 600 कोंबड्यांचा मृत्यू

संग्रहित
संग्रहित

वीरगाव | वार्ताहर

अकोले तालुक्यातील वीरगाव फाट्यानजीक तांभोळ शिवारात बिबट्यामुळे साधारण 600 कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या. यापैकी जवळपास 60 कोंबड्यांचा बिबट्याने जागेवर फडशा पाडला.

प्रताप भास्कर धात्रक यांचे शेतातील कुक्कुटपालन शेडवर गुरुवारी मध्यरात्री 12 ते 1 वाजेच्या सुमारास बिबट्याने हा हल्ला केला. शेडची संरक्षणात्मक तारेची जाळी तोडून त्याने शेडमध्ये प्रवेश केला.गावठी कावेरी जातीच्या या कोंबड्या होत्या. 3 महिने वयाच्या या कोंबड्यांची दुसर्‍याच दिवशी विक्री होणार होती.

बिबट्याने कोंबड्यांवर हल्ला केल्यानंतर घाबरुन आणि दबून जवळपास 600 कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या.त्यापैकी 60 कोंबड्यांना फस्त करुन हा बिबट्या पसार झाला. बिबट्यामुळे प्रताप धात्रक यांचे साधारण 1 लाख 25 हजार  रुपयांचे नुकसान झाले.

वीरगाव शिवारात सध्या बिबट्याचा वावर सुरु आहे. एकावर बिबट्याने हल्लाही केला होता. अनेकांच्या पशुधनावर बिबट्याचा हल्ला करणे सुरुच आहे. पशुधनावर हल्ले झाल्याने मोठे आर्थिक नुकसान आजपर्यंत शेतकर्‍यांचे झाले आहे. वनखात्याने वीरगाव शिवारात पिंजरा लावूनही बिबट्याची हुलकावणी देणे सुरुच आहे.

देवठाण परिमंडळाचे वनपाल पंकज देवरे, वनकर्मचारी सुनिल गोसावी, बाळासाहेब थोरात आदींनी बिबट्यापासून बचावासाठी जनजागृती सुरु केली आहे. शाळांमधून आणि प्रत्यक्ष भेटीतूनही हे सर्वजण वेळोवेळी मार्गदर्शन करतात.
वीरगाव नंतर तांभोळ शिवारात आता बिबट्याने उच्छाद मांडला असून शेतकरी घाबरुन गेले आहेत. वीरगाव फाट्यानजीक तांभोळ शिवारात वनखात्याने पिंजरा लावावा, अशी मागणी होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com