
अकोले |प्रतिनिधी| Akole
अकोले तालुक्यातील विविध भागात काल बुधवारी सायंकाळी वादळ वार्यासह विजांच्या लखलखाटासह मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली.पहिल्याच पावसाने अकोले शहरातील अगस्ति विद्यालयासमोरील तळमजल्यातील गाळ्यांत पाणी घुसले.
अकोले शहर व परिसरात दुपारी 4 वाजे नंतर वातावरण बदलले.सायंकाळी 7 वाजेच्या दरम्यान पावसास सुरवात झाली.रात्री साडे आठ वाजे पर्यंत पावसाने दमदार हजेरी लावली. परिसरात एक तास मुसळधार पाऊस पडला.रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. या पावसामुळे वातावरणातील उकाडा काही प्रमाणात कमी होण्यास मदत झाली.अकोले व राजूर शहर तसेच परिसरातील अनेक गावांत वीज गायब झाली होती.
अकोले शहरातील अगस्ति विद्यालयाचे समोरील तुळशीराम संकुलात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या व ठेकेदाराच्या चुकीच्या कामामुळे पावसाचे पाणी अनेक गाळ्यांमध्ये घुसले आहे.विशेष म्हणजे आ.डॉ.किरण लहामटे यांच्या संपर्क कार्यालयासह अनेक व्यावसायिकांच्या गाळ्यात देखील हे पाणी घुसले आहे.याठिकाणी रस्त्याची उंची वाढली असून अद्याप गटारीचे काम सुरू न झाल्याने हे पाणी थेट रस्त्यावरून गाळ्यांमध्ये घुसले आहे.ठेकेदारावर मेहेरबान असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या गटारीचे काम तात्काळ मार्गी लावणे गरजेचे आहे.रात्री उशिरापर्यंत येथील व्यावसायिक गाळ्यांत साठलेले पाणी काढत होते.
वीरगाव परिसरात रोहिणीची गारांसह बरसात
कांदा उत्पादकांची धावपळ, कोंथिंबीरीला फटका
वीरगाव वार्ताहराने कळविले की, अकोले तालुक्यातील वीरगाव परिसरात बुधवारी सायंकाळी 7 वा. रोहिणी नक्षत्राच्या सरी बरसल्या.काही प्रमाणात लहान गारांचाही वर्षाव झाला.उकाड्याने हैराण झालेल्या सर्वांनाच या पावसाने गारव्याचा आनंद दिला.
मेघगर्जनेसह घोंघावणार्या जोरदार वादळात सुरु झालेल्या पावसाने कांदा उत्पादकांची मात्र धावपळ उडाली.शेतात काढून पडलेला कांदा झाकण्यासाठी त्यांची धावाधाव झाली.चांगले बाजारभाव देणार्या काढणीस आलेल्या कोंथिंबीरीत पाणी जादा साचल्यास त्याचा मोठाच आर्थिक फटका शेतकर्यांना बसेल.काही ठिकाणच्या जोरदार धारांमुळे नुकतीच लागवड झालेली कोंथिंबीर आणि मकाचे बियाणेही दडपण्याची शक्यता आहे.टोमॅटो,कोबी,फ्लॉवर, वालवड आणि शेतातील इतर भाजीपाला पिकांना याचा फटका बसू शकतो. कोतुळ वार्ताहराने सांगितले की, अकोले तालुक्यातील कोतूळ परिसरात आज बुधवारी सायंकाळी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. परिसरातील चास ,लिंगदेव, कोतूळ, आंभोळ, पैठण, धामणगाव पाट या परिसरात पावसाने या हजेरी लावली परिसरात सुमारे अर्धा तास पावसाने हजेरी लावली या पावसासोबत काही प्रमाणात गारांचा शिडकाव झाला अवकाळी पावसाने शेतकर्यांची धांदल झाली कांदा पीक काढण्याचे काम सुरू असल्याने कांदा झाकून ठेवणे व वाहतूक करणे इत्यादी कामे सुरू असताना पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्यांची कांदा झाकण्यासाठी धावपळ उडाली.
काजव्यांची संख्या वाढणार
भंडारदरा वार्ताहराने कळविले की, भंडारदरा धरण परिसर व पाणलोटातही काल रात्री 8 वाजेपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला त्यामुळे दोन चार दिवसांत काजव्यांचा लखलखाट वाढणार असून काजव्यांचे मनोहारी दृष्य पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असतात.