
अकोले |प्रतिनिधी| Akole
अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकारिणीची सर्वसमावेशक अशी निवड करण्यात आली असून या निवडी पूर्णपणे संस्थेच्या घटनेप्रमाणे कायदेशीर बाबींच्या अधीन राहून कार्यकारी विश्वस्त माजी मंत्री मधुकरराव पिचड व त्यांचे दोन सहकारी कायम विश्वस्त यांच्याशी चर्चा करुन झाल्याचा, दावा संस्थेचे नूतन पदाधिकारी व कार्यकारिणीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकारिणी निवडत असताना मधुकरराव पिचड यांनी त्यांचे सहकारी कायम विश्वस्त सिताराम पा. गायकर व वैभव पिचड यांनी अत्यंत लोकशाही मार्गाने तालुक्यातील राजकीय पक्षांच्या प्रमुखांशी चर्चा करुन त्यांच्या संमतीने शिफारशीने विश्वस्त, पदाधिकारी, कार्यकारिणी यांची निवड केली आहे. या निवडीमध्ये सर्वपक्षीय कार्यकर्ते यांना स्थान देण्यात आले आहे. या उभय पदाधिकार्यांमध्ये पदवीधर, इंजिनिअर, संशोधक, शिक्षक, वकील, उद्योजक, डॉक्टर, व्यापारी, महिला, राजकीय, सामाजिक कार्यकर्ते व सर्व समाज घटक यांना प्राधान्य देण्यात आले आहे.
तथापि नेतृत्वावर शिंतोडे उडविण्याचा प्रयत्न काही मंडळी दुर्दैवाने करत आहेत. विश्वस्त, पदाधिकारी, कार्यकारिणी निवडताना जे संस्थेचे सभासद आहेत, त्यांचाच यामध्ये समावेश करण्यात आला आहे. वास्तविक पाहता शैक्षणिक संस्था कुटुंबाच्या मालकीच्या केल्याची अनेक उदाहरणे असताना पिचड यांनी सर्व समावेशक विस्वस्त नेमून हे एक आदर्श उदाहरण संपूर्ण शिक्षण व्यवस्थेसमोर ठेवले आहे. राजकीय जोडे बाजुला ठेऊन एक निकोप, चांगले वातावरण या शैक्षणिक संकुलात निर्माण केले आहे.
संस्थेवर आर्थिक घोटाळ्याचा होणारा आरोप हा धादांत खोटा आहे. सर्व विभागांचे कामकाज शासनाच्या नियमानुसार चालते. दरवर्षी संस्थेचे हिशोबपत्र लेखापरीक्षकाकडून तपासले जातात. संस्थेचे व संस्थेच्या सर्व शाखांचे व्यवहार पारदर्शी आहेत. लेखापरीक्षण अहवालामध्ये जर काही आक्षेपार्ह असते तर त्या बाबी निश्चित पुढे आल्या असत्या, किंबहुना त्या लपून राहिल्या नसत्या.
नोकरभरतीत आर्थिक घोटाळ्याचाही आरोप होतो. परंतु प्रत्येक विभागात नोकरभरती करताना विद्यापीठाने व शासनाने निवड समिती गठीत केलेली असते, त्याप्रमाणेत सदर कर्मचार्यांची नियुक्ती गुणवत्तेवर आधारीत केली जाते. तथापि नेतृत्वावर टिका- टिपण्णी करणे, संस्था बदनाम करणे हा काही मंडळींचा उद्योग असून तालुक्यातील सर्वसामान्य जनता या भूलथापांना बळी पडणार नाही.
संस्थेचे काम सर्व विश्वस्त मंडळाच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य प्रामाणिकपणे करतील असा विश्वास नूतन अध्यक्ष इंजि. सुनिल दातीर, उपाध्यक्ष विठ्ठलराव चासकर, सचिव सुधाकर देशमुख, सहसचिव बाळासाहेब भोर, खजिनदार धनंजय संत, कार्यकारिणी सदस्य यशवंत आभाळे, डॉ. दामोदर सहाणे, आनंदराव नवले, शरद देशमुख, सुधाकर आरोटे, मच्छिंद्र धुमाळ, कचरू पा शेटे, रमेश जगताप, सौ. कल्पना सुरपुरीया यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केला आहे.
अकोले तालुक्यातील शैक्षणिक प्रगतीचा आलेख बघितला तर मधुकरराव पिचड शिक्षण सम्राट होऊ शकले असते परंतु दिन, दलित, आदिवासी, मागास, भटके, बहुजन, कामगार, समाजातील मुलांना शिक्षण मिळावे यासाठी आदिवासी भागात शासकीय आश्रमशाळा तसेच आदिवासी उन्नती सेवा मंडळाच्या माध्यमातून शिक्षणाचे जाळे निर्माण केले. मधुकरराव पिचड हे मंत्री पदावर असताना सन 2014 ला कायम विना अनुदानितला कायम हा शब्द काढण्यात मोठे योगदान देणार्या व्यक्तिवर शिंतोडे उडविणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे.
- गिरजाजी जाधव नूतन कायम विश्वस्त, अ. ता. एज्यु. सोसायटी