अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी बचावचे आंदोलन मागे

बहुतेक मागण्या मान्य, सहा महिन्यांत होणार अंमलबजावणी
अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी बचावचे आंदोलन मागे

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी बचाव कृती समितीच्या मागण्यांना संस्थेचे कार्यकारी विश्वस्त मधुकरराव पिचड व संस्था पदाधिकार्‍यांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद व भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराजे धुमाळ यांची आंदोलनातील यशस्वी मध्यस्थी यामुळे कृती समितीने काल शनिवारी तिसर्‍या दिवशी आपले धरणे आंदोलन मागे घेतले.

आंदोलकांबरोबर काल झालेल्या चर्चेत कार्यकारी विश्वस्त, माजी मंत्री मधुकरराव पिचड व अन्य पदाधिकार्‍यांनी बहुतेक मागण्या मान्य करत तसा लेखी प्रस्तावही आंदोलकांना दिला होता. मात्र तरीही कृती समितीने आपले आंदोलन मागे न घेता धरणे सुरूच ठेवले. त्यानंतर संस्थेतील सत्ताधार्‍यांनी प्रति आंदोलनाचा इशारा दिला होता. आंदोलनाच्या विरोधात सोमवारी मोर्चा काढण्यात येणार होता. यासंदर्भात शनिवारी सकाळी राजूर येथे प्रमुख कार्यकर्त्यांची बैठकही झाली. या पार्श्वभूमीवर कृती समितीने शनिवारी दुपारी आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली. त्यामुळे संभाव्य संघर्ष टळला. अर्थात आश्वासन दिल्याप्रमाणे सहा महिन्यांत कार्यवाही न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा कृती समितीच्यावतीने देण्यात आला आहे.

श्री. धुमाळ यांनी प्रारंभी संस्था व कार्यकारी विश्वस्त मधुकरराव पिचड यांची भूमिका विषद केली व आंदोलन मागे घेण्याची विनंती आंदोलनकर्त्यांना केली. संस्थेच्यावतीने कायम विश्वस्त गिरजाजी जाधव, अध्यक्ष इंजि. सुनील दातीर, सेक्रेटरी सुधाकरराव देशमुख, खजिनदार धनंजय संत, कार्यकारिणी सदस्य आनंदराव नवले, रमेश जगताप, डॉ. डी. के. सहाणे, शरद देशमुख, सुधाकर आरोटे, कल्पना सुरपुरीया आदी उपस्थित होते.

यावेळी राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षाताई रुपवते, माकपचे नेते डॉ. अजित नवले, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी प्रशासक बी. जे. देशमुख, बाजार समितीचे सभापती परबत नाईकवाडी, शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी, माजी प्राचार्य शांताराम गजे, राष्ट्र सेवा दलाचे विनय सावंत, आरपीआयचे चंद्रकांत सरोदे, शांताराम संगारे, राष्ट्रवादी चे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश खांडगे, तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, कार्याध्यक्ष राजेंद्र कुमकर, रवी मालुंजकर, अमित नाईकवाडी, अनिल कोळपकर, बाळासाहेब भांगरे,अरुण रुपवते, भागवत शेटे, विकास बंगाळ, संजय वाकचौरे, संदीप भाउसाहेब शेणकर, संतोष नाईकवाडी, विकास शेटे आदी उपस्थित होते.

अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे सभासदत्व खुले करा, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे सभासदत्व करण्याच्यादृष्टीने संस्थेचे कार्यकारी विश्वस्त मधुकरराव पिचड, आ. डॉ. किरण लहामटे, डॉ. अजित नवले, अशोकराव भांगरे, विजयराव वाकचौरे यांची समिती गठीत करून सदर समिती संस्थेचे सभासदत्व देणेबाबत निर्णय घेईल. संस्थेची घटना कालबाह्य झाली असून या घटनेतील तरतुदीमुळे संस्था धर्मादाय संस्था न राहता खाजगी संस्था बनत असल्याने संस्थेच्या घटनेत लोकशाही मुल्यांना रास्त वाव देणारे बदल करा. या मागणीवर संस्थेच्या घटनेमध्ये योग्य ते बदल करण्याच्यादृष्टीने विविध शैक्षणिक संस्थांच्या घटनेचा आढावा घेण्यासाठी वरील समितीतील सदस्य व तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक करून सर्वसमावेशक बदल करण्याच्यादृष्टीने निर्णय घेण्यात येईल. संस्थेवर एका कुटुंबातील एकापेक्षा अधिक सदस्यांना सभासद किंवा कार्यकारिणी सदस्य, अधिकारी, पदाधिकार, विश्वस्त होता येणार नाही, अशी संस्थेच्या घटनेत तरतूद करण्याचे मान्य करण्यात आलेले आहे. आदींसह आंदोलनकर्त्यांच्या 14 मागण्यांसंदर्भात संस्थेच्यावतीने लेखी पत्र यावेळी आ. डॉ. लहामटे व आंदोलनकर्ते यांना देण्यात आले.

सेक्रेटरी सुधाकर देशमुख यांनी मागण्यांबाबतचे लेखी पत्र आंदोलकांसमोर वाचन केले. यावेळी आ. डॉ. किरण लहामटे, विजयराव वाकचौरे, डॉ. संदीप कडलग यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर धरणे आंदोलन व दोन्हीही बाजूंनी आगामी काळात पुकारलेले मोर्च, आंदोलने मागे घेत असल्याचे जाहीर करण्यात आले. शेवटी युवा स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष सुरेश नवले यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.