अकोले तालुक्यात 18 जनावरांना लम्पी रोगाची लागण


संगहीत चित्र
संगहीत चित्र

अकोले |प्रतिनिधी| Akole

करोनानंतर आता लम्पी रोगाने राज्यात थैमान घातले असून अकोले तालुक्यात 18 जनावरांना लम्पी रोगाची लागण झाली आहे. लम्पीचा अकोल्यात शिरकाव झाल्याने शेतकर्‍यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. त्यामुळे अकोले तालुका पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला आहे.

तालुक्यातील गर्दणी, धामणगाव आवारी , ब्राम्हणवाडा याठिकाणी ही लम्पीची लागण झालेली जनावरे सापडली आहेत. दरम्यान कळस, विरगाव, देवगाव, सातेवाडी येथील लम्पी संशयित जनावरांचे रक्ताचे व गाठींचे नमुने पुणे येथील अन्वेषण प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून लवकरच त्याचा अहवाल प्राप्त होईल, अशी माहिती तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक धिंदळे यांनी दिली आहे. दरम्यान जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने श्री. ससे यांची तालुका पालक म्हणून नियुक्ती केली असून त्यांनी पंचायत समितीमध्ये तातडीने एक बैठक बोलावली होती.

या बैठकीस अकोले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राहुल शेळके, तालुका पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक धिंदळे, अमृतसागर दूध संघाचे कार्यकारी संचालक दादाभाऊ सावंत, लम्पी एक्सपर्ट डॉ. राजेंद्र भांगरे आदी उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील सरकारी व खाजगी पशुवैद्यकीय डॉक्टर, पशुधन पर्यवेक्षक हेही उपस्थित होते.

लम्पीचा सामना करण्यासाठी सर्वांनी खबरदारी घेत, शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करीत, लम्पी सदृश जनावर आढळल्यास तातडीने प्रशासनाला कळवावे, असे आवाहन या बैठकीत अधिकार्‍यांनी केले. तर खबरदारीचे उपाय म्हणून केलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. सर्वांनी समन्वय ठेवत काम करावे. हा साथीचा रोग असल्याने, याबाबत जनजागृती महत्त्वाची आहे, ती सर्वांनी प्राधान्याने करावी, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com