अकोले-संगमनेर रस्त्याच्या खड्ड्यांसाठी पिचड यांचा अभियंता दालनात ठिय्या

आजपासून खड्डे बुजविण्याचे कार्यकारी अभियंत्यांचे आश्वासन
अकोले-संगमनेर रस्त्याच्या खड्ड्यांसाठी पिचड यांचा अभियंता दालनात ठिय्या

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुक्यातील जनता एक करोनाने तर दुसरे अकोले- संगमनेर रस्त्याच्या दुर्दशेने हैराण झाली आहे.

दिपावली सणासुदीच्या काळात लोकांची संगमनेर-अकोले रस्त्यावर जास्त वर्दळ असते. त्यामुळे अकोले- संगमनेर रस्त्यावरील खड्डे डांबराने तात्काळ बुजवावे, या मागणीसाठी माजी आमदार वैभवराव पिचड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर.आर.पाटील यांच्या दालनात ठिय्या दिला. त्यावर आज बुधवारपासून तात्काळ खड्डे बुजविण्याचे आश्वासन कार्यकारी अभियंता यांनी दिले.

अकोले तालुक्यातील कोल्हार-घोटी राजमार्ग प्रश्नासंदर्भात केलेल्या आंदोलनात माजी आ.वैभवराव पिचड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, संगमनेर यांच्या दालनात भाजपा तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, अकोलेचे उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, नगरसेवक परशराम शेळके, सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, चंद्रकांत घुले, शंभू नेहे, राहुल देशमुख, विजय पवार, हितेश कुंभार, ज्ञानदेव निसाळ, मोईन शेख आदी उपस्थित होते.

यावेळी चर्चा करताना माजी आ. पिचड आक्रमक होऊन म्हणाले, हायब्रेड युनिटी अंतर्गत कोल्हार-घोटीवरील संगमनेर-बारी रस्त्याच्या सुरु असलेल्या कामाचा ठेका देताना रहदारीसाठी रस्ता उपलब्ध करुन देण्याचे ठरलेले असताना ठेकेदाराने याकडे दुर्लक्ष केलेले आहे. रस्त्याच्या कडेची झाडाची कत्तल करण्याची जेवढी घाई या ठेकेदार व प्रशासनाने केली,

तेवढीच घाई विद्युत पोल शिफ्टींग व इतर कामात करीत नाही. या रस्त्याच्या कामामुळे व रस्त्यावरील वळणे सरळ न केल्याने झालेल्या व होणार्‍या अपघातांचा क्लेम सार्वजनिक बांधकाम विभागावर करायचा का? असा प्रश्न त्यांनी केला. सध्या दिपावली सण उत्सवाचा काळ जवळ आला आहे. अकोले-संगमनेर भागात लोकांची या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरु आहे. खरेदी तसेच सणाला घरी येणारे-जाणार्‍यांचे प्रमाणही जास्त आहे.

मात्र, या रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे. रस्त्यात मोठमोठे खड्डे पडलेले आहे.अनेकांच्या दुचाकी खड्ड्यात आदळून अथवा सरकून अपघातही झालेले आहेत. रस्त्यावर निकृष्ट दर्जाचा मुरुम व माती टाकल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धुळीचा फुपाटा होतो. ठेकेदार व सार्वजनिक विभाग जनतेच्या जिवाशी खेळत आहे.

तेव्हा तात्काळ अकोले-संगमनेर रस्त्यावरील खड्डे बुजवावेत व या रस्त्यावरील विद्युत पोलचे शिफ्टींग करावे, अशी मागणी केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर.आर.पाटील यांनी अकोले- संगमनेर रस्त्यावरील खड्डे आजपासून बुजविण्याचे काम सुरु होईल, असे आश्वासन देत संबंधित ठेकेदाराला फोनवर तशा सूचनाही केल्या.

सरकारच्या दोन्ही विभागातील वादात तालुक्यातील जनता भरडली जात आहे.कोल्हार-घोटी रस्त्याच्या कामात 32 गाव पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन उध्वस्त झाली आहे. यामुळे रस्त्याचे कामही थांबले व पाणीपुरवठा योजनेचे कामही थांबले आहे. आता ही पाईपलाईन दुरूस्त कोण करणार? यावर सार्वजनिक बांधकाम व जीवन प्राधिकरण या विभागात वाद आहे. त्यामुळे शासनाच्या या दोन विभागाच्या वादात जनतेला पाणी नाही व रस्ताही होत नाही, अशी दुहेरी फरपट होत असल्याची प्रतिक्रिया माजी आ.वैभवराव पिचड यांनी व्यक्त केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com