अकोले- संगमनेरात ‘एक गाव एक गणपती’ची क्रेज कायम!

नगर जिल्ह्यात अवघ्या 280 गावांत उपक्रम
अकोले- संगमनेरात ‘एक गाव एक गणपती’ची क्रेज कायम!

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

‘एक गाव एक गणपती’ संकल्पनेतून यंदा जिल्ह्यातील 280 गावांत उपक्रम राबवत सामाजिक एकोप्याचा संदेश देण्यात आला. मागील वर्षी 323 गावांत हा उपक्रम राबविण्यात आला होता. यंदा मात्र यामध्ये घट झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही अकोले तालुक्यातील अकोले व राजूर या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्वाधिक 57 गावांमध्ये ही संकल्पना राबवण्यात आली. त्याच बरोबरीने संगमनेर तालुक्यातील संगमनेर शहर, तालुका, घारगाव व आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 57 गावांमध्ये ही संकल्पना राबवण्यात आली.

गणेशोत्सव काळात गावात गट-तट निर्माण होऊन वाद होतात. त्यातून गावातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना गेल्या काही वर्षांपासून राबवण्यात येत आहे. पोलीस ठाण्याच्या प्रयत्नातून त्यांच्या हद्दीतील गावांमध्ये ही योजना राबविण्यात येते. पोलीस ठाण्यांमार्फत गावांमध्ये बैठक घेऊन, या योजनेसंदर्भात प्रबोधन करण्यात येते. मात्र, अलीकडच्या काही वर्षांपासून ही संकल्पना मागे पडत असल्याने उपक्रम राबविणार्‍या गावांची संख्या कमी होत आहे. अशा परिस्थितीतही यंदा अकोले तालुक्यातील अकोले व राजूर 57 व संगमनेर तालुक्यातील शहर, तालुका, घारगाव व आश्वी या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 57 गावांनी हा उपक्रम राबवून सामाजिक एकोपा निर्माण करण्याचा संदेश दिला आहे. पारनेर तालुक्यात पारनेर व सुपा पोलीस ठाणे हद्दीतील 27 गावात ही संकल्पना राबवण्यात आली. कर्जत तालुक्यात केवळ दोन गावात ही संकल्पना राबवण्यात आली. लोकसंख्येने मोठ्या असलेल्या गावात या संकल्पनेला प्रतिसाद मिळत नाही. त्या तुलनेत एक हजार, दोन हजार लोकसंख्या असलेल्या गावात ही संकल्पना वाढीस येत आहे.

पोलीस ठाणेनिहाय गावे

भिंगार 1, पारनेर 14, सुपा 13, नगर तालुका 21, एमआयडीसी 2, श्रीगोंदे 4, बेलवंडी 9, जामखेड 18, शेवगाव 10, पाथर्डी 9, नेवासा 10, शनिशिंगणापूर 1, सोनई 2, राहाता 5, लोणी 2, कोपरगाव तालुका 11, कोपरगाव शहर 2, राहुरी 17, श्रीरामपूर शहर 4, श्रीरामपूर तालुका 12, संगमनेर शहर 12, संगमनेर तालुका 27, राजूर 42, अकोले 15, घारगाव 15, आश्वी 3, मिरजगाव 1, कर्जत 1 असे आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com