अकोले तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची दुर्दशा, वाहनचालक त्रस्त

अगस्ती मंदिर कॉर्नर येथे आज रास्तारोको आंदोलन
अकोले तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची दुर्दशा, वाहनचालक त्रस्त

अकोले |प्रतिनिधी| Akole

सर्कशीतील मृत्यूगोलास कुणाचीच दाद न मिळे, इथे रस्त्यावर बनले आता मृत्यूचे सापळे अशा प्रकारची दयनीय अवस्था तालुक्यातील सर्वच प्रमुख रस्त्यांची झाली आहे. दरम्यान या सर्वच रस्त्यांच्या प्रचंड दुर्दशे बाबत आज शुक्रवारी सकाळी 9 वाजता अगस्ति मंदिर कॉर्नर देवठाण रस्ता येथे तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्यावतीने रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे युवा नेते महेश नवले व पंचायत समितीचे माजी सदस्य, भाजपचे युवा नेते अरुण शेळके यांनी दिला आहे. या आंदोलनासंदर्भात तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदनही देण्यात आले आहे.

अकोले येथील महात्मा फुले चौक ते ओम साई डेअरीपर्यंत देवठाण रस्ता खड्डे आणि चिखलात हरवला आहे. अशीच अवस्था अकोले-परखतपूर-वाशेरे रस्ता, अकोले ते कारखाना रस्ता, अकोले -कुंभेफळ-कळस रस्त्याची झाली आहे. रस्त्याला कुणी वाली आहे की नाही अशी संतप्त भावना स्थानिक नागरिक व वाहनचालकांकडून ऐकू येत आहे.

या सर्वच रस्त्यांवरून वाहनचालकांना रस्ता (धावपट्टी) शोधून वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावर निळवंडे कालव्याच्या पुलासाठी कंत्राटदाराने खोदकाम केले होते. खोदकाम करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या गटारी बुजवून टाकल्याने तसेच मुरुमाऐवजी माती पसरवल्यामुळे या कालव्यावरील पुलाच्या दक्षिण आणि उत्तर बाजूला चिखलाचे साम्राज्य असल्यामुळे खड्डे आणि निसरड्या जागेतून वाहने चालवताना अग्निदिव्य पार करायला लागत आहे.

येथून स्कुटीवरून जाणार्‍या महिलांना अपघात झाले आहेत. जलसंपदा विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराबाबत सर्वसामान्य नागरिक वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी आहे. अकोले देवठाण रस्त्याबाबत संतप्त प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते भाऊसाहेब चासकर यांनी दिली असून संबंधित विभागांना या प्रश्नाचे कुठलेही सोईर सुतक राहिले नसल्याचे चासकर यांनी म्हटले आहे.

अकोले तालुक्यातील अनेक महत्त्वाच्या रस्त्यावर सगळीकडे मोठे खड्डे पडल्याने दुचाकीवर प्रवास करणार्‍या प्रवाशांना पाठदुखी, कंबरदुखीचा त्रास सुरू झालाय. नागरिकांचे आरोग्य बिघडण्यास सार्वजनिक बांधकाम विभाग कारणीभूत आहे. दरवर्षी केवळ तात्पुरती डागडुजी करण्याऐवजी संपूर्ण रस्ता नव्याने करण्याची गरज आहे. तालुक्यातील मुख्य रस्त्यांची जर अशा प्रकारे दुरवस्था असेल तर अन्य विभागातील रस्त्यांबाबत न बोललेच बरे अशा संतप्त प्रतिक्रिया लोकांमधून ऐकू येत आहेत.

बारी ते संगमनेर या कोल्हार-घोटी रस्त्याचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले मात्र पहिल्याच पावसाळ्यात या मार्गावर अनेक ठिकाणी रस्ता उखडला आहे. यावरून रस्त्याच्या कामाच्या दर्जा बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यासंदर्भात तालुक्याचे आजी -माजी लोकप्रतिनिधी कोणत्याही स्वरूपाचा आवाज उठवत नसल्याची खंत सर्वसामान्य नागरिक, वाहनचालक व्यक्त करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com