
अकोले |प्रतिनिधी| Akole
अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शहरातील एका कापड दुकानातून सायंकाळच्यावेळी एक अल्पवयीन मुलगी गायब होण्याची घटना घडली. तर दुसरीकडे राजूर पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात हरिपाठासाठी गेलेली अल्पवयीन मुलगी गायब झाली आहे. दोन मुली दोन दिवसांत गायब झाल्याची घटना घडल्याने अकोले तालुक्यात खळबळ उडाली आहे.
राजूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गावामधील एक मुलगी 31 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात सप्ताहाच्या कार्यक्रमानिमित्त हरिपाठ करण्यासाठी गेली होती. मुलीच्या आजीने राजूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अल्पवयीन मुलीला (वय 17 वर्षे 8 महिने) पळवून नेण्याचा गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरीकडे अकोले शहरातील एका कापड दुकानात कामास असलेली मुलगी रात्र झाली तरी घरी आली नाही.
म्हणून संबंधित घरच्या मंडळींनी सदर कापड दुकानात चौकशी केली. त्यावेळेस कापड दुकान मालक यांनी सांगितले की, सदर मुलगी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास दुकानातून बाहेर गेली आहे. कोणीतरी पळवून नेले असावे असा तिच्या नातेवाईकांचा संशय आहे. यासंदर्भात मुलीच्या आईने माझी अल्पवयीन मुलगी (वय 16 वर्षे 1दिवस) हिला अज्ञात व्यक्तीने पळवून नेले असावे अशी फिर्याद दिली आहे. अकोले व राजूर पोलीस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत.