माजी मंत्री पिचड-आठवलेंच्या कानगोष्टी तर खासदार लोखंडेनी घेतले दर्शन

सोशल मीडियात पिचड, आठवले, लोखंडे यांच्या छायाचित्रांची चर्चा
माजी मंत्री पिचड-आठवलेंच्या कानगोष्टी तर खासदार लोखंडेनी घेतले दर्शन

अकोले | प्रतिनिधी

केंद्रीय मंत्री रामदास आठवले व खासदार सदाशिव लोखंडे हे दोघेही जण माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या भेटीला आले होते. खासदार लोखंडे यांनी पिचड यांचे दर्शन घेतले तर मंत्री रामदास आठवले आणि माजी मंत्री पिचड यांच्या मध्ये काही कानगोष्टीही झाल्या. हे दोन्हीही फोटो आज सोशल मीडियात दिवसभर फिरत होते व त्याची चर्चा होत होती.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले राजूर येथे पिचड यांच्या निवास स्थानी येणार असल्याने त्यांच्याकडे सकाळपासूनच कार्यकर्त्यांची गर्दी होती. मंत्री आठवले येण्यापूर्वीच खासदार लोखंडे त्यांच्या भेटीला आले. माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी खा.लोखंडे यांचे स्वागत केले. यावेळी खासदार यांच्या सोबत राजूर येथील कार्यकर्ते संतोष मुतडक उपस्थित होते.

शिर्डी लोकसभा खासदार म्हणून काम करताना निळवंडे साठी निधी उपलब्ध करण्यासाठी सर्वांचेच मोलाचे मार्गदर्शन झाले असून माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचेही निळवंडे पुनर्वसनासाठी मोठे योगदान असल्याची कबुली खासदार सदाशिव लोखंडे यांनी यावेळी बोलताना दिली .

भाजप आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष विजय भांगरे यांनी भंडारदरा येथील विल्सन डॅमचे नाव बदलून क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचे नाव धरणास द्यावे अशी मागणी करणारे निवेदन यावेळी खासदार लोखंडे यांना दिले. त्यावर खासदार सदाशिव लोखंडे यांनी याबाबत मुख्यमंत्री व संबधित खात्याला पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी माजी मंत्री पिचड यांचे दर्शन घेऊन ते पुन्हा शिर्डीकडे रवाना झाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com