अकोलेचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांची तडकाफडकी बदली

अकोलेचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांची तडकाफडकी बदली

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांची जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील यांनी अकोले पोलीस ठाण्यातून थेट अहमदनगर नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली केली आहे. त्यांच्या जागी सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांची प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या पाच महिन्यांच्या कार्यकाळात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अकोले पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी पकडल्याच्या घटना घडल्या. शिवाय लॉकडाऊनच्या ही काळात पोलिसांचा विनाकारण फिरणार्‍यांवर कोणताही अंकुश राहिलेला दिसत नव्हता. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यवसाय सुरूच होते. त्यामुळे परमार हे वादग्रस्त ठरले होते.

जिल्ह्याचे पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी याबाबत काल शनिवारी आदेश काढला. अकोलेचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांची यापूर्वी ही नियुक्ती झाल्यानंतर पोलीस कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला होता. यामुळे त्यांची अहमदनगर येथे नियंत्रण कक्ष येथे काही दिवसातच बदली केली होती. मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे पुन्हा त्यांना अकोले पोलीस ठाण्याचा कार्यभार सोपविण्यात आला.

मात्र अलीकडेच पोलीस नाईक संदीप पांडे याला 5 हजार रुपये घेतांना पोलीस ठाण्याच्या आवारातच नगर च्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले होते. त्यामुळे पोलिसांची प्रतिमा मलिन झाली होती. त्यास जबाबदार धरून परमार यांच्या तडकाफडकी बदलीचा आदेश जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील यांना काढावा लागला. तर आता परमार यांच्या जागी अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्याकडे अकोले पोलीस स्टेशनचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. आता घुगे यांचे समोर अवैध व्यवसाय बंद करण्यासह पोलीस यंत्रणेतील भ्रष्टाचार कमी करण्याचे आव्हान असणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com