
अकोले |प्रतिनिधी| Akole
निळवंडे प्रकल्पा (Nilwande Project) संदर्भातील आपल्या विविध मागण्यांसाठी (Demand) म्हाळादेवी येथील अबालवृद्धांनी तहसील कार्यालयासमोर (Tahsil Office) लाक्षणिक उपोषण केले. आंदोलन (Movement) सुरू असतानाच तहसील कार्यालयात (Tahsil Office) आलेले प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे (Dr. Shashikant Mangarule) यांनी आंदोलकांची भेट न घेतल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करीत आंदोलकांनी तहसीलदार यांचे दालनात प्रवेश करीत तीव्र निदर्शने केली.
आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत निळवंडे धरणाच्या कालव्याची कामे सुरू केली जाऊ देणार नाहीत असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
म्हाळादेवी गावातील शिवार रस्ता क्रॉसिंग पूल तीव्र चढ उताराचे झाले असून त्यांची उंची कमी करावी, डावा व उजवा कालवा शिवारातूंन गेला आहे. त्यामुळे शेतकर्यांसाठी पक्के सर्व्हिस रोड करावे, म्हाळादेवी कालव्यात पडून तीन शेतकर्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे वारसांना प्रत्येकी 50 लाख रुपये नुकसानभरपाई मिळावी व अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. प्रारंभी बाजारतळाहुन आंदोलनकर्ते मोर्चाने तहसील कार्यालयावर पोहचले.
या उपोषणात मोठ्या प्रमाणावर नागरिक, महिला व लहान मुले उपस्थित होते. दरम्यान लाक्षणिक उपोषण सुरू असतांना प्रांत डॉ. शशिकांत मंगरुळे हे अकोले तहसील कार्यालयात आले असतांना आंदोलनस्थळी उपस्थित राहिले नाही. त्याबद्दल आंदोलनकर्ते व नेते मंडळींनी त्यांचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. जोपर्यंत जिल्हाधिकारी व जलसंपदाचे मुख्य अभियंता हे म्हाळादेवी येथे येत नाहीत व प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्याशी चर्चा करत नाहीत, प्रश्न सुटत नाहीत तो पर्यंत निळवंडे उजव्या व डाव्या कालव्याचे काम सुरू करू देणार नसल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
यावेळी भाकप चे ज्येष्ठ नेते कॉ.कारभारी उगले,माकप चे नेते कॉ डॉ अजित नवले,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मिनानाथ पांडे,उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख महेशराव नवले,तालुकाप्रमुख डॉ मनोज मोरे,ज्येष्ठ नेते प्रभाकर फापाळे,आर पी आय चे प्रदेश सरचिटणीस विजयराव वाकचौरे,
अगस्ति कारखान्याचे संचालक प्रदीप हासे,अशोकराव देशमुख,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, प्रदेश सरचिटणीस विनोद हांडे, विकास बंगाळ, रुंभोडीचे सरपंच रवी मालुंजकर, मेहेंदुरीचे हभप पांडुरंग फरगडे, इंदोरीचे चंद्रकांत नेहे, डॉ.कैलास फरगडे, आर पी आयचे नेते शांताराम संगारे, माकपचे ऍड ज्ञानेश्वर काकड, म्हाळादेवीचे सरपंच मारुती मेंगाळ, उपसरपंच राणी मुंढे, माजी उपसरपंच कविता हासे, विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष प्रकाश हासे, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुरेश मुंढे, भाजपचे कार्यकर्ते दिलीप हासे, दशरथ हासे, भरत हासे, विलास हासे, सुभाष हासे, कल्पना हासे, ताराबाई हासे, नयना हासे आदींनी प्रशासनाच्या गलथान कारभाराचे वाभाडे काढत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
प्रांताधिकारी तहसील कार्यालयात येऊन आंदोलन कर्त्यांची भेट न घेता बाहेर गेल्याने संतप्त झालेल्या आंदोलन कर्त्यांनी तहसीलदार यांच्या दालनात निदर्शने केली. यावेळी काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र सहा पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी वेळीच हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्यांना शांत केले. याच दरम्यान पुन्हा प्रांताधिकारी डॉ मंगरुळे यांचे तहसील कार्यालयात आगमन झाले. यावेळी त्यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. शेवटी त्यांना न भेटता आंदोलनकर्ते उपोषणस्थळी दाखल झाले. जलसंपदाचे प्रभारी कार्यकारी अभियंता प्रमोद माने यांना आंदोलन कर्त्यांच्यावतीने निवेदन देण्यात आले.