स्वस्त धान्य घेऊन जाणारे चार ट्रक संशयावरून ताब्यात

अकोलेतून राजूरमार्गे भंडारदराकडे जाताना पोलिसांची कारवाई
स्वस्त धान्य घेऊन जाणारे चार ट्रक संशयावरून ताब्यात

अकोले | प्रतिनिधी

अकोले येथून राजूर मार्गे भंडारदऱ्या कडे जात असणार्या स्वस्त धान्य घेऊन जाणाऱ्या चार ट्रक पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतल्या आहेत. ट्रक चालकांकडे असणारी धान्य वाहतुकी बाबतची कागदपत्रे संशयास्पद असल्याचे समजते. त्यामुळे पोलिसांनी या ट्रक पोलिस ठाण्यात आणून उभ्या केल्या असून पोलीस चौकशी आहे.

दरम्यान माजी आमदार वैभवराव पिचड यांनी पोलीस ठाण्यास भेट देऊन या घटने बद्दल चिंता व्यक्त करीत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

तालुक्यातील राजूर येथे पोलिसांनी स्वस्त धान्य घेऊन जाणाऱ्या चार ट्रक पकडल्या आहेत. ट्रक चालकांच्या संशयास्पद हालचाली व कागदपत्रावर गोडाऊन किपरच्या सह्या नाहीत, तसेच या ट्रकचे क्रमांक एम एच 17 ऐवजी मुंबई पासिंग आहेत. राजूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, सहायक फौजदार नितीन खैरनार, हेड कॉन्स्टेबल देविदास भडकवार यांनी या चारही ट्रक ताब्यात घेऊन तहसीलदार मुकेश कांबळे यांच्याशी संपर्क साधून घटनेचा तपशील दिला आहे. सध्या करोनामुळे आदिवासी भागातील जनतेला धान्य मिळत नसताना या धान्याचा परस्पर विक्रीचा संशय आल्याने राजूर पोलिसांनी या ट्रक ताब्यात घेऊन तपास सुरु केला आहे.

याबाबत तहसीलदार कांबळे यांनाही पत्र देऊन मालाची तपासणी करून पुढील कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. तालुक्यात स्वस्थ धान्य पुरवठा करणाऱ्या वाहनांवर हिरवा पट्टा असावा, वितरण व्यवस्था असा बोर्ड असावा असे असतानाही हे नियम न पाळता मुंबई पासिंगच्या ट्रक का निवडल्या? संबंधित अधिकृत पुरवठा धारक कोण? याची चौकशी व्हावी अशी मागणी आदिवासी विकास परिषदेचे जिल्हा अध्यक्ष विजय भांगरे यांनी केली आहे. माजी आमदार वैभवराव पिचड यांचेसह राजूरचे सरपंच गणपत देशमुख, उपसरपंच गोकुळ कानकाटे, माजी सरपंच संतोष बनसोडे, पांडुरंग खाडे, सुरेश भांगरे, आकाश देशमुख आदींनी चौकशीची मागणी केली आहे.

राजूर पोलिसांनी राजूर येथे चार ट्रक पकडल्याचे समजले आहे. याबाबत संबंधितांना विचारणा करून सत्यता पडताळून तथ्य आढळले तर योग्य ती कारवाई केली जाईल.

मुकेश कांबळे (तहसीलदार )

जिल्हा पुरवठा विभागाने या अनागोंदी कारभारास आळा घालावा. आज आदिवासी भागात खाण्यासाठी अन्न मिळत नाही. खावटी नाही, रोजगार नाही. त्यात जर असे धान्य कोणतेही सरकारी निर्बंध न पाळता अन्नधान्य नेले जात असेल तर ते सहन केले जाणार नाही. राजूर पोलिसांना धन्यवाद दिले पाहिजे तर महसूल विभागाने राजकीय दडपण झुगारून न्याय निवाडा करावा, नाही तर कुंपणानेच शेत खाल्ले असे म्हणावे लागेल. योग्य पद्धतीने तपास करून संबंधितांवर कारवाई होणे अपेक्षित आहे.

वैभवराव पिचड (माजी आमदार )

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com