अकोले नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी-सेना युतीवर शिक्कामोर्तब

अकोले नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी-सेना युतीवर शिक्कामोर्तब

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी होण्याचे दृष्टीने सकारात्मक बैठक झाली असून 17 पैकी ओबीसी 4 जागांचा अपवाद वगळता 13 प्रभागांतून 3 प्रभाग शिवसेनेला देण्याचे ठरले असून कम्युनिस्ट पक्षही सोबत आहे. आता काँग्रेस पक्षाबरोबर बैठकीचे बोलणे सुरू आहे. लवकरच महाविकास आघाडी अस्तित्वात येईल, असा विश्वास आ. डॉ. किरण लहामटे यांनी व्यक्त केला.

अकोले नगरपंचायत निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. अनेक बैठकित एकमत न झाल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेने सर्व प्रभागांत आपल्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले आहेत. येत्या 13 डिसेंबर रोजी माघारीचा शेवट दिवस असल्याने महाविकास आघाडी होण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. महाविकास आघाडीसाठी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांची बैठक संपन्न झाल्यानंतर आमदार डॉ. किरण लहामटे व शिवसेना तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ यांनी ही माहिती दिली. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सीताराम पा. गायकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, शिवसेना शहराध्यक्ष नितिन नाईकवाडी, सेना नेते महेशराव नवले, राष्ट्रवादीचे नेते संपतराव नाईकवाडी, प्रतापराव देशमुख, बबन वाळुंज आदी उपस्थित होते.

यावेळी आ. डॉ. लहामटे म्हणाले, अकोले नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी होणार असून शिवसेनेबरोबर झालेली बैठक फलदायी झाली आहे. शिवसेना, माकप बरोबर आघाडीची चर्चा पूर्ण झाली आहे. शिवसेनेला नगरपंचायतच्या एकूण 17 जागांपैकी ओबीसी 4 जागा सोडून उर्वरित 13 प्रभागांतून 3 जागा देण्यावर एकमत झाले आहे. आता काँग्रेस पक्षासोबत आघाडीबाबत चर्चा सुरू आहे व लवकरच काँग्रेस पक्षही आमच्याबरोबर येऊन महाविकास आघाडी होईल, असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी शिवसेना तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ म्हणाले, राज्यात ज्याप्रकारे आपले तिन्ही पक्षाचे महाविकास आघाडी सरकार आहे त्याच पद्धतीने अकोलेतही महाविकास आघाडी करून नगरपंचायत निवडणूक लढविण्यास शिवसेना तयार असून त्यानुसार आज बैठकीत निर्णय झाला असून 13 प्रभागांतून 3 प्रभागांत शिवसेना उमेदवार देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

काँग्रेसने आपले 12 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यापूर्वी आघाडी म्हणून चर्चेच्या पाच फेर्‍या झाल्या होत्या. मात्र त्यात काँग्रेसचे मन वळविण्यात राष्ट्रवादीला यश आले नाही. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा पंचायत समिती येथील कोविड च्या काळात आमदार डॉ. लहामटे यांचे उपस्थितीमध्ये झालेल्या आढावा बैठकीत राष्ट्रवादी युवकच्या पदाधिकार्‍याकडून झालेला अवमान काँग्रेस कार्यकर्ते अद्यापही विसरले नाहीत. काँग्रेसची अकोले शहरात अनेक प्रभागांत चांगली ताकद आहे. त्यामुळे ते प्रभाग काँग्रेस कदापिही सोडू शकणार नसल्याचे समजते. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस सहभागी होण्याची शक्यता धूसर वाटत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com