आमदारांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले

अकोले ते देवठाण या रस्त्यावरील खड्डे बुजविले
आमदारांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले

अकोले (प्रतिनिधी)

सर्वसामान्य जनतेच्या संतप्त भावना पत्रकारांनी लोकप्रतिनिधी यांचे पुढे मांडताच अकोले देवठाण रस्त्यावर पडलेले असंख्य खड्डे बुजविण्याच्या कामास तातडीने सुरुवात झाल्याचे आशादायी चित्र काल शनिवारी जनतेला दिसले. अशाच प्रकारे तालुक्यातील सर्वच प्रमुख व विविध गावांतील रस्ते यांचीही त्वरित डागडुजी व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

पावसामुळे अकोले देवठाण सह इतर रस्त्यावर असंख्य खड्डे पडलेले आहेत. प्रवासी व पादचारी पूर्णपणे वैतागले आहेत. अनेकांचे छोटे मोठे अपघात या खराब रस्त्यांमुळे झाले आहेत. अतिशय संतप्त भावना जनसामान्यांतून ऐकू येत असल्याने लोकशाहीचा चौथा स्तंभ समजल्या जाणाऱ्या पत्रकारांकडे नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती.

डांबरीकरणाचे काम जेव्हा होईल तेव्हा होईल पण तोपर्यंत खड्डे बुजवावेत एवढी माफक अपेक्षा लोक करत आहेत. अकोलेच्या प्रवरा नदीवरील मोठ्या पुलाच्या पुढे निघाल्या पासून तर तालुक्याची हद्द सपे पर्यंत रस्त्यावर अति पावसामुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या कडेच्या साईड पट्ट्यांचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने अगोदरच अरुंद असलेल्या या रस्त्यावरून खाली उतरायचे कुणी यावरून अनेक वेळा कुरबुरी, भांडणे झाल्याचे पहावयास मिळाले.

बाजार समिती समोरील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साठल्याने तलावसदृश परिस्थिती दरवर्षी तेथे निर्माण होत असते. मध्यंतरी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मिनानाथ पांडे, पं.स.चे माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळण्याऐवजी आपल्याच सरकारमधील लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांविषयी गांधीगिरी करत रस्त्याच्या मध्यभागी पडलेल्या खड्डयांत वृक्षारोपण केले होते तर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असलेले तांभोळचे माजी सरपंच मंगेश कराळे यांचेसह ग्रामस्थांनी रस्त्याच्या प्रश्नी आंदोलनाचा इशारा दिला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांना सामाजिक, राजकिय कार्यकर्ते, ग्रामस्थ यांनी बारंबार विनंती बजा सूचना करूनही निर्ढावलेले हे अधिकारी टाळाटाळ करीत असल्याचे चित्र संपूर्ण तालुक्यात दिसत आहे. तालुक्यातील सर्वच रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे..

आढळा धरणाच्या जलपूजनासाठी आलेले तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार डॉ. किरण लहामटे यांना शनिवारी -पत्रकारांनी रस्त्यावर थांबवून सर्वसामान्य जनतेच्या संतप्त भावना सांगितल्या. यावर लगेचच आमदारांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकान्यास फोन लावत आपल्या नेहमीच्या स्टाईलने स्पीकर सुरू करत फैलावर घेतले. अतिशय कडक शब्दांत अधिकाऱ्याची खरडपट्टी काढली व आजच्या आज काम चालू करा अशी तंबी दिली मग मात्र अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. अखेर सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागे झाले व त्यांनी लगेचच खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले. शनिवार-रविवारची सुट्टी असतानाही अधिकाऱ्यांनी दाखविलेल्या तत्परतेबद्दल त्यांचे व आमदारांचे कौतुकही होत असले तरी तालुक्यातील बहुतांश रस्त्यांवर पडलेले खड्डेही याच तत्परतेने बुजवावेत, अशी मागणी होत आहे.

Related Stories

No stories found.