अकोले बाजार समिती सभापती-उपसभापती पदाची 24 मे रोजी निवड

अकोले बाजार समिती सभापती-उपसभापती पदाची 24 मे रोजी निवड

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती-उपसभापती पदाची निवडणूक बुधवार दिनांक 24 मे रोजी होत आहे. महाविकास आघाडीत सध्या सुरू असणार्‍या कुरबुरी आणि नाराजी नाट्याच्या पार्श्वभूमीवर बाजार समिती पदाधिकारी निवडीबाबत राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांमध्ये उलट सुलट चर्चा आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे या पदाचे प्रबळ दावेदार असून त्यांच्या गळ्यात बाजार समितीच्या सभापती पदाची माळ पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने 11 जागा जिंकत बहुमत मिळविले तर भाजपला 7 जागांवर समाधान मानावे लागले होते. त्यातील 3 जागा निवडणुकीपूर्वीच बिनविरोध करण्यात भाजपला यश आले होते. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मते बाद झाली त्याचा फटका भाजपला काही जागांवर बसल्याचे पहावयास मिळाला.

महाविकास आघाडीतील छोट्या मोठ्या घटक पक्ष यांनीही खरेदी विक्री संघ व बाजार समिती पदाधिकारी निवडी करताना समन्यायाची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख धुरीणांकडे केली होती.

बाजार समिती निवडणुकीत काँग्रेसला व्यापारी मतदार संघाच्या दोन्हीही जागा देण्यात आल्या मात्र या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षावर मोठी नामुष्की ओढण्याची वेळ आली. मात्र निवडणूक निकाल लागल्यानंतर काही तासांतच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना यासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यात अलीकडेच झालेल्या खरेदी विक्री संघाच्या पदाधिकारी निवडीतही काँग्रेसला राष्ट्रवादी व शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने कात्रजचा घाट दाखवून काँग्रेसची नाराजी ओढवून घेतली आहे.

त्यातच सेनेच्या ठाकरे गटाचे शहर प्रमुख नितीन नाईकवाडी यांनी खरेदी विक्री संघ पदाधिकारी निवडीवरून पक्षाच्या असलेल्या सोशल मीडिया ग्रुपवरून आपली खदखद बोलून दाखविल्याने महाविकास आघाडीत सर्व काही अलबेल नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. आगामी काळात या सर्व नाराजी नाट्याचा पुढील अंक पहावयास मिळेल, असे राजकीय जाणकारांकडून बोलले जात असल्याचे ऐकू येत आहे. सभापती व उपसभापती पदाची निवड बिनविरोध करण्यात महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांना यश येते की नाही की विरोधी भाजप प्रणित शेतकरी विकास मंडळ सभापती व उपसभापती पदाची निवडणूक लढविणार हे निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे.

बाजार समितीच्या पदाधिकारी निवडीसाठी नूतन संचालक मंडळाची विशेष सभा बुधवार दिनांक 24 मे रोजी दु.12-30 वाजता बाजार समितीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शिरीष कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. त्यांना सहाय्य म्हणून सहाय्यक निबंधक कार्यालयातील योगेश कापसे व बाजार समितीचे सचिव अरुण आभाळे काम पाहणार आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com