Akole
Akole
सार्वमत

आजपासून अकोले बंदचा निर्णय

अकोलेत करोनाचा शिरकाव,प्रशासनाकडून अगस्ती कारखाना रोड कंटेनन्मेंट घोषित

Nilesh Jadhav

अकोले|प्रतिनिधी |Akole

गेली साडे तीन महिन्यांपासून करोनापासून कोसो दूर असलेल्या अकोले शहरात रविवारी एका पतसंस्थेतील कर्मचारी करोना बाधित आढळला. यानंतर प्रशासनाची डोकेदुखी वाढली.

दरम्यान प्रशासनाने कारखाना रोड कंटेन्मेंट झोन जाहीर करत संपर्कातील 24 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले. तर अकोले शहर आज मंगळवारपासून आठवडाभर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

अकोले तालुक्यात करोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढत आहे. गेल्या काही दिवसांत तालुक्यातील रोज वेगवेगळ्या गावात करोना पॅाझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. ग्रामीण भागानंतर सुरूवातीपासून सुरक्षित राहिलेल्यो अकोले शहरात रविवारी करोनाने अखेर शिरकाव केला. रविवारी रात्री शहरातील कारखाना रोडला हासे कॉम्पलेक्समध्ये राहणारा एका पतसंस्थेतील कर्मचार्‍याचा करोना अहवाल पॅाझिटीव्ह आला.

हा रुग्ण संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव कोंझिरा येथे आढळून आलेल्या रुग्णांच्या संपर्कात आल्याची माहिती आहे. हा अहवाल आल्याचे कळताच शहरात खळबळ उडाली व नागरिकांत घबराटीचे वातावरण पसरले. प्रशासनाने तात्काळ दखल घेत तहसीलदार मुकेश कांबळे, पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे, नगर पंचायतचे मुख्याधिकारी डॉ. सचिन पटेल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.इंद्रजीत गंभीरे यांनी कर्मचार्‍यांसह कारखाना रोडला जाऊन पाहणी केली.

दुपारनंतर कारखाना रोडच्या प्रवेशद्वारावरच बॅरिकेट लावले गेले. रोडवरील हासे कॉम्पलेक्स व परिसर कंटेन्मेंट झोन घोषित केला. यावेळी कंटेन्मेंट झोन केलेेेल्या परिसरात तब्बल 150 घरांतील जवळपास 1050 लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

संपर्कातील व पतसंस्थेतील कर्मचार्‍यांसह 24 जणांचे स्वॅब घेेेऊन ते तपासणीसाठी अहमदनगर जिल्हा रुग्णणालयातील प्रयोगशाळेत पाठविले असल्याची माहिती तालुका वैैैैद्यकीय अधिकारी डॉ.इंद्रजीत गंभीरे यांंनी दिली.

तालुक्यात आतापर्यंत करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 41 झाली आहे. त्यापैकी 30 रुग्ण करोनामुक्त झाले तर ब्राम्हणवाडा येथील 5, पिंपळगाव निपाणी 2, विरगाव 1, देवठाण 1 व अकोले शहरातील 1 अशा 10 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत तर एकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान अकोले शहरातील महात्मा फुले चौकात सकाळी तहसीलदार कांबळे, पोलीस निरीक्षक जोंधळे, मुख्याधिकारी पटेल आदींनी उभे रहात प्रशासनाचे नियम न पाळणार्‍या मोटार सायकल, चारचाकी वाहन धारक यांचेवर दंडात्मक कारवाई केली. मास्क न वापरणे, दुचाकी व चार चाकीत नियम डावलून अधिक माणसे बसवून घेणे अशा वाहन चालकांवरही कारवाई करण्यात आली आहे.

अगस्ती पतसंस्थेचे मुख्य कार्यालय याच परिसरातील रासने कॉम्प्लेक्स येथे आहे. तेथे कंटेन्मेंट झोन जाहीर केल्याने अगस्ती पतसंस्थेचे सर्व व्यवहार हे बस स्थानक परिसरातील शहर शाखेत होणार आहेत, अशी माहिती अगस्ती पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब भोर यांनी दिली. याच परिसरात असणार्‍या स्टेट बँक, मर्चंट बँक, संतुजी धुमाळ पतसंस्था, नगर अर्बन बँक यांनाही प्रशासनाच्यावतीने कंटेन्मेंट झोनमध्ये असल्यामुळे त्यांचे व्यवहार बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे तहसीलदार मुकेश कांबळे यांनी सार्वमतशी बोलताना सांगितले.

अकोले शहरातील व्यापारी असोसिएशन, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, व नागरिक यांनी अकोले शहरात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अकोले शहर आजपासून 20 जुलैपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत अकोले शहरातून रिक्षाद्वारे दवंडी देण्यात आली आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com