संगमनेरच्या नेतृत्वाला टीकेचे लक्ष करणे योग्य नाही

माजी मंत्री पिचड व ना. थोरात यांचे पाटपाणी प्रश्नी मोठे योगदान : मधुकर नवले
संगमनेरच्या नेतृत्वाला टीकेचे लक्ष करणे योग्य नाही

अकोले (प्रतिनिधी)

माजी व मंत्री मधुकरराव पिचड व महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे पाटपाणी प्रश्नी मोठे योगदान आहे. अकोले तालुक्याने संघर्षातून उत्कर्ष साधला आहे. संगमनेरने सतत साथ दिली असून संगमनेरच्या नेतृत्वाला टीकेचे लक्ष करणे योग्य नाही. आम्ही आज पर्यंत कधीही कुणाचे कान फुंकले नाहीत. अकोले तालुक्यातील नवीन नेत्यांनी भुतकाळ समजून घ्यायला हवा, असा टोला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले यांनी लगावला.

निळवंडेच्या उजव्या उच्चस्तरीय कालव्याप्रश्नी अकोले तालुक्यातील प्रवरा खोऱ्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. उजव्या उच्चस्तरीय कालव्यात पाणी सोडण्यासाठी प्रवरा नदीवरील जलसेतूचे काम तातडीने पूर्ण करावे यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोठ्या संख्यने शेतकरी रस्त्यावर उतरले होते. पाणी हक्क संघर्ष समितीच्यावतीने महामोर्चात महिना भरात जलसेतुचे काम मार्गी न लागल्यास जलसेतुला अडथळा ठरणारी पाईपलाईन शेतकरी उखडून फेकून देतील, असा इशारा आ. डॉ. किरण लहामटे यांचेसह आंदोलकांनी दिला होता.

या पार्श्वभूमीवर अकोले येथील शासकीय विश्रामगृह येथे काँग्रेस पक्षाच्यावतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नवले बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते सोन्याबापू वाकचौरे, मंदाताई नवले, ज्येष्ठ नेते मिनानाथ पांडे, संभाजी वाकचौरे, शिवाजी नेहे, विक्रम नवले आदी उपस्थित होते.

यावेळी नवले म्हणाले, काँग्रेस पक्ष कायम शेतकरी आणि कामगारांच्या बाजूचा पक्ष असून तालुक्याच्या विकासाबाबत आम्ही नेहमी जागरूक असतो. आम्ही आजपर्यंत पाट पाण्याच्या प्रश्नाला अग्रक्रम दिला असून पाण्यावर आमचा अधिकारच आहे. यासाठी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांना आम्ही श्रेय देतो. त्यात आम्हाला काही कमीपणा वाटत नाही. जोपर्यंत उजव्या भागाला पाणी नाही, तो पर्यंत पाणी प्रश्न सुटला असे म्हणता येणार नाही. वरील सर्व भाग हा खरीपावर अवलंबून आहे. त्या भागातील शेतकरी यांच्या भूमिकेला आमचा पाठींबा आहे, पण कालच्या आंदोलनात आम्हाला जाणीवपूर्वक निमंत्रण दिले नाही तरी आम्ही या प्रश्ना बाबत कायम शेतकरी वर्गासोबत आहोत.

तालुक्याचे आमदार समन्वय राखण्यात कमी पडत आहेत. ज्या ज्यावेळी ना. बाळासाहेब थोरात अकोलेत येतात तेव्हा हे आमदार गैरहजर असतात. काही प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावर आलेच पाहिजे असेही नवले यांनी सांगत कालच शनिवारी ना. बाळासाहेब थोरात यांच्याबरोबर चर्चा झाली असून जून अखेर उजवा कालवा चालू होईल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी मिनानाथ पांडे यांनी कालव्याच्या तांत्रिक बाबी समजून सांगत कालव्या बाबत शंका घेणे चुकीचे आहे, असे सांगितले. या पुढे आम्ही स्वतः दबाव आणून काम तडीस नेण्याचा प्रयत्न करणार आहे. आम्ही कायम तालुक्यातील शेतकऱ्यांबरोबर आहोत, असेही पांडे म्हणाले. प्रास्ताविक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस शिवाजी नेहे यांनी केले. आभार विक्रम नवले यांनी मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com