अकोल्यात दुसर्‍या दिवशीही मुसळधार पाऊस

अकोल्यात दुसर्‍या दिवशीही मुसळधार पाऊस

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले सोमवार पाठोपाठ काल मंगळवारी सलग दुसर्‍या दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे अगस्ती सहकारी साखर कारखाना,

परखतपूर, संगमनेर रस्त्यावरील गडाख शोरूम ते शाम्प्रो ऑफिस हे प्रमुख रस्ते पाण्याखाली गेले आहेत. या परिसरातील अनेक दुकाने व घरांत पावसाचे पाणी शिरले.

सोमवारी दुपारी सुमारे चार ते पाच तास जोरदार पाऊस पडला. त्यापाठोपाठ काल मंगळवारी सुद्धा दुपारच्या वेळेस जोरदार पाऊस पडला. धुव्वाधार पावसामुळे परिसरातील ओढे, नाल्यांचे, गटारींचे पाणी थेट रस्त्यावर आले. सुरुवातीला असणार्‍या कमी पावसाचे प्रमाण जसे वाढत गेले तसे काही वेळातच रस्त्यांवर नदीपात्राचे स्वरूप पाहायला मिळाले.

त्यामुळे शहरातून संगमनेरकडे जाणार्‍या गडाख शोरूम ते शाम्प्रो पर्यंत रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. अगस्ति कारखाना रस्ता व परखतपूरकडे जाणार्‍या रस्त्यावर महालक्ष्मी कॉलनी, मंदिर परिसरात रस्त्यावर नदी सारखे पाणी वाहत होते.

या परिसरातील तळमजल्यात असणार्‍या अनेक दुकानांत व घरात पाणी शिरल्याने छोट्या व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. या परिसरातील शेतकर्‍यांच्या शेतात असणार्‍या पिकांचे मोठे नुकसान झाले. तातडीने या नुकसानीचे पंचनामे करून संबंधितांना नुकसान भरपाई द्यावी,अशी मागणी जोर धरू लागली.

संगमनेर-अकोले रस्त्यावरून ये-जा करणार्‍या दुचाकी, चार चाकी वाहन चालकांनी नजीकच्या महालक्ष्मी कॉलनी, राधानगरी या भागातून आपापले घर गाठले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com