
अकोले |प्रतिनिधी| Akole
अकोले शहरासह तालुक्यात बहुतांश ठिकाणी काल शनिवारी दुपारी वादळ वार्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही भागांत मोठ्या प्रमाणात गारांचा पाऊस पडला. शेतात व रस्त्यावर पाणीच पाणी वाहत होते. या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाला आहे.
अकोले तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. काल शनिवारी दुपारी मुळा विभागातील चास, लिंगदेव, लहीत, वाशेरे या भागांत वादळ वार्यासह पाऊस पडला. प्रवरा पट्ट्यात अकोले शहरासह इंदोरी, मेहेंदुरी, रुंभोडी, टाकळी, ढोकरी, गर्दनी, कुंभेफळ, कळस खुर्द व बुद्रुक, परखतपूर या भागांत पावसाने हजेरी लावली. यातील इंदोरी-मेहेंदुरी परिसरात गारांचा ढीग साठल्याचे चित्र पहावयास मिळाले.
तर आढळा विभागात सावरगाव पाट, समशेरपूर, टाहाकारी या गावांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला.थोड्याच वेळात रस्त्यावर व शेतात पाणीच पाणी झाले होते. या जोरदार पावसामुळे शेतकर्यांच्या शेतातील कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच गहू, हरभरा, भाजीपाला या पिकाचेंही मोठे नुकसान झाले असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.