अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुक्यातील निवडणूक झालेल्या 36 ग्रामपंचायत निवडणुकीचे निकालात भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री मधुकरराव पिचड व माजी आमदार वैभवराव पिचड यांचे मोठ्या ग्रामपंचायतीवर वर्चस्व अबाधीत राहिले आहे.

राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, कार्याध्यक्ष राजेंद्र कुमकर, जि.प. सदस्य रमेशराव देशमुख, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मिनानाथ पांडे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव यांना या निवडणुकीत धक्का बसला तर जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर, जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती कैलासराव वाकचौरे, भाजपचे जि प चे गट नेते जालिंदर वाकचौरे, अमृतसागर दूध संघाचे व्हा. चेअरमन रावसाहेब वाकचौरे, अगस्तिचे संचालक रामनाथ वाकचौरे, सुनील दातीर, माजी पं स सदस्य अरुण शेळके यांनी त्यांचे गावावरील वर्चस्व कायम ठेवले आहे.

अनेक ठिकाणी मतदारांनी परिवर्तन घडवून आणले असले तरी प्रस्थापितांनी अनेक ठिकाणी आपले वर्चस्व अबाधित ठेवले आहे. भाजप व महाविकास आघाडीकडुन ग्रामपंचायत सत्तेबाबद दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत.

अकोले तालुक्यातील 52 ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी एका ग्रामपंचायतीची निवडणूक उमेदवारी अर्ज न आल्याने रद्द झाली तर 15 ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. 36 ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. सकाळी . वा . अकोले तहसिल कार्यालयाच्या आवारात मतमोजणी ला प्रारंभ झाला.एकुण 7 फेर्यांमध्ये मतमोजणी शांततेत पार पडली.

अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभय परमार, उपनिरीक्षक दीपक ढोमने, राजूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांचे मार्गदर्शना खाली कर्मचारी वृंद यांनी चोख बंदोबस्त ठेवला. सकाळी निवडणुकीचे निकाल जसजसे बाहेर पडत होते. तसतसे उमेदवार-कार्यकर्ते -मतदार यांनी विजयाचा जलोष केला. गुलालाची उधळण करीत, फटाके वाजवत आनंद साजरा केला.

अनेक ग्रामपंचायतीत तरुण उमेदवारांनी बाजी मारली तर अनेक ठिकाणी सत्तांतर झाले असल्याचे पहायला मिळाले. अनेक ठिकाणी पक्षापेक्षा गटातट महत्वाचे ठरले. काही ठिकाणी एकाच पक्षाच्या दोन गटात निवडणूक झाली. माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या समर्थकांनी महत्वाच्या ग्रामपंचायती मध्ये यश संपादन केले. मात्र भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव यांच्या नेतृत्वातील पॅनलला आंबड ग्रामपंचायतीत दारूण पराभवाचा सामना करावा लागला. तेथे माजी सरपंच रोहिदास जाधव यांच्या व महाविकास आघाडी प्रणित पॅनलला सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळविता आला.

माजी आमदार वैभवराव पिचड समर्थक जि प चे अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती कैलासराव वाकचौरे यांच्या गटाने कळस बु ग्रामपंचायत निवडणूकीत सर्व जागा जिंकल्या. माजी पंचायत समिती सदस्य अरुण शेळके यांनी विरोधकांचे आव्हान मोडीत काढत देवठाण मध्ये 17 पैकी 16 जागा जिंकल्या तर विरोधी अगस्ति चे माजी संचालक अशोकबाबा शेळके, शिवाजी पाटोळे, मोहन बाबा शेळके यांच्या विरोधी पॅनलला धूळ चारली.

जि.प.भाजप गटनेते जालिंदर वाकचौरे, दुध संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, अगस्ती कारखान्याचे ज्येष्ठ संचालक रामनाथ वाकचौरे यांनी विरगाव ग्रामपंचायतीत महाविकास आघाडीचा पराभव करत सत्ता मिळवली. तसेच तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या कोतुळ ग्रामपंचायत निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केलेली असताना माजी जि.प.उपाध्यक्ष सीताराम देशमुख, माजी सरपंच राजेंद्र देशमुख, अगस्ति चे संचालक बाळासाहेब देशमुख, माजी संचालक सयाजीराव देशमुख यांचे पॅनलने 13 विरूद्ध 4 असा विजय मिळवत जिल्हा परिषद सदस्य रमेशराव देशमुख यांच्या पॅनलचा पराभव केला.

धुमाळवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव धुमाळ व शिवसेना तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ यांच्या एकत्रित पॅनलने विजय मिळवला. धामणगाव आवारी ग्रामपंचायतमध्ये शिवसेनेचे माजी पंचायत समिती सदस्य अप्पासाहेब आवारी व अगस्ती पतसंस्थेचे चेअरमन, भाजपाचे नेते बाळासाहेब भोर यांच्या पॅनलने बाजी मारली. तेथे राष्ट्रवादीचे बाळासाहेब आवारी व पत्रकार गणेश आवारी यांच्या पॅनलचा धुव्वा उडविला. गणेश आवारी यांचे पॅनलला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले.

टाकळी येथे अगस्ति कारखान्याचे ज्येष्ठ संचालक गुलाबराव शेवाळे यांच्या गटाला 5 जागा तर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे यांच्या गटाला 4 जागांवर समाधान मानावे लागले. उंचखडक बुद्रुक येथे अगस्ती चे माजी संचालक अशोकराव देशमुख यांचे पॅनलला 4 तर विरोधी अगस्ती चे माजी संचालक भाऊसाहेब खरात व अमृतसागर दूध संघाचे माजी चेअरमन प्रतापराव देशमुख यांचे पॅनलला 3 जागा मिळाल्या.

येथे पिचड समर्थक दोन गटातच निवडणूक झाली. ढोकरी मध्येही पिचड समर्थक दोन गटातच निवडणूक झाली. तेथे विकास शेटे यांचे गटाला 5 तर रमेश पुंडे यांचे गटाला 4 जागा मिळाल्या भाजपाचे ज्येष्ठ नेते, जिल्हा बँक अध्यक्ष सीताराम पाटील गायकर यांच्या नेतृत्वाखालील ब्राम्हणवाडा ग्रामपंचायतीत भारत आरोटे व देवराम गायकर यांचे ग्रामविकास मंडळ चे सर्व च सर्व उमेदवार विजयी झाले व बदगी ग्रामपंचायतीतही श्री. गायकर याचे कार्यकर्ते भूषण शिंगोटे यांच्या पॅनलने विजय मिळवला.

गणोरे ग्रामपंचायत निवडणुकीत अगस्तीचे संचालक सुनील दातीर, संतोष आंबरे यांचे गटाला 8 तर पंचायत समिती सदस्य नामदेव आंबरे यांचे गटाला 5 जागा मिळाल्या. सुगाव खुर्द येथे माजी आमदार वैभवराव पिचड व जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या 6 जागा आल्या तर राष्ट्रवादीला एका जागेवर समाधान मानावे लागले.

कुंभेफळ येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मिनानाथ पांडे यांचे गटाचे 1 विजयी, 1 महिला बिनविरोध निवडून आली. तर 2 अपक्ष निवडून आले. तर विरोधी सुनील कोटकर गटाचे 3 निवडून आले. तर याच गटाचे 2 यापूर्वी बिनविरोध आले आहेत. तांभोळ येथे अण्णासाहेब कराळे व माजी सरपंच मंगेश कराळे यांचे नेतृत्व खालील पॅनेलने विजय मिळविला. तेथे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष राजेंद्र कुमकर यांच्या गटाला पराभव पत्करावा लागला.

कळस खुर्द येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरेश गडाख यांची सत्ता आली आहे. आढळा खोर्यातील गणोरे, देवठाण, विरगाव या मोठ्या व महत्वाच्या ग्रामपंचायतीत महाविकास आघाडीची डाळ शिजू शकली नाही. यापूर्वी तालुक्यातील चितळवेढे, निळवंडे, निब्रळ, कळंब, बहिरवाडी, वाघापूर, उंचखडक खुर्द, जाचकवाडी, म्हाळादेवी, मोग्रस, मनोहरपूर या 11 ग्रामपंचायती बिनविरोध पार पडल्या.

काल सकाळी अकोले शहराला यात्रचे स्वरुप आले होते. विजयी उमेदवाराचा भाजप तसेच राष्ट्रवादी कार्यालयात आजी-माजी आमदारांनी सत्कार केला. ठिक ठिकाणी कार्यकर्ते गुलालाची उधळण करित फटाके वाजवत आनंद व्यक्त करतानाचे चित्र दिसले. आंबड च्या विजयी उमेदवाराच्या मोटरसायकल रॅलीने अकोलेकरांचे लक्ष वेधले.घोषणा देत कार्यकर्ते अंबड कडे गेले. आमदार डॉ. किरण लहामटे, माजी आमदार वैभवराव पिचड यांनी आपल्या निवडून आलेल्या समर्थक उमेदवाराचे स्वागत सत्कार केले.

परस्पर विरोधी दावे...

तालुक्यातील बिनविरोध व सार्वत्रिक निवडणूक झालेल्या 51 ग्रामपंचायतीत पैकी राष्ट्रवादी काँग्रेस, इंदिरा काँग्रेस, शिवसेना या महाविकास आघाडीने 38 ग्रामपंचायतीत सत्ता मिळवलेली असल्याचा दावा आ. डॉ. किरण लहामटे व शिवसेनेचे तालुका प्रमुख मछिंद्र धुमाळ यांनी केला तर दुसरीकडे 51 ग्रामपंचायतीपैकी 45 ग्रामपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टीने बहुमत मिळविले असून त्यातील 35 ग्रा. प. वर निर्विवाद वर्चस्व तर 466 ग्रा. प. सदस्यांपैकी 293 ग्रा. प. सदस्य हे भाजपाला मानणारे असण्याचा दावा भाजपाचे तालुका अध्यक्ष सिताराम भांगरे यांनी केला आहे.

पराभुत उमेदवाराच्या पतीराजाने घेतला गुलाल

धुमाळवाडी ग्रामपंचात निवडणुकीचा निकाल जाहीर होताना सौ. आशा शिवाजी धुमाळ यांचा विजय झालेला असताना विरोधी पराभूत उमेदवार सुवर्णा अजय वर्पे यांचा निकाल पाहण्यात अथवा ऐकण्यात गल्लत झाल्याने त्यांनी विजयी झाल्याचे समजून गुलाल उधळत आनंद व्यक्त केला तर या प्रकरणी विजयी उमेदवाराचे पती शिवाजी धुमाळ हे गोंधळून गेले होते. त्यांनी व अजय वर्पे यांनी थोड्या वेळात पुन्हा तहसिल कार्यालयात जाऊन याची चैकशी केली असता सौ. आशा धुमाळ विजयी झाल्याचे स्पष्ट झाले.

पत्रकारांकडून तहसिलदारांचा निषेध..!

ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया सुरु असताना या ठिकाणी वार्ताकनासाठी गेलेल्या पत्रकारांना ग्रामपंचायत निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मुकेश कांबळे यांनी मतमोजणी साठी जाण्यास मज्जाव केला व निवडणूक आयोगाच्या ओळखपत्राची मागणी केली. तर यावेळी पोलीस निरीक्षक अभय परमार व उपनिरीक्षक दीपक ढोमने यांनी पत्रकारांना आत मध्ये प्रवेश देण्यास आमची काहीही अडचण नसल्याचे सांगितले. या घडलेल्या घटनेने पत्रकारांमध्ये नाराजी निर्माण होऊन पत्रकार संघाने तात्काळ बैठक घेत या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला व याबाबत पत्रकार संघाचे वतीने जिल्हाधिकारी यांचे कडे तहसीलदार यांच्या कार्यपद्धती विषयी नाराजी व्यक्त करुन त्यांच्या धोरणाची चौकशी करण्याची मागणी करण्याचे बैठकीत ठरले.